
अमळनेरमध्ये तंबाखूसाठी किरकोळ वादातून युवकाचा खून
अमळनेरमध्ये तंबाखूसाठी किरकोळ वादातून युवकाचा खून
अमळनेर (प्रतिनिधी): शहरातील पैलाड भागात रविवारी रात्री घडलेल्या घटनेने परिसर हादरला आहे. केवळ तंबाखू न दिल्याच्या किरकोळ वादातून मुकेश भिका धनगर (३८, रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, पैलाड, अमळनेर) या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपी निखिल विष्णू उतकर (४५, रा. करंजा, पंचवटी, नाशिक) याला अटक केली आहे.
फिर्यादी दिनेश धनगर यांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ११ वाजता हेडावे नाक्याजवळील वडाच्या झाडाखाली मुकेश व निखिल यांच्यात तंबाखूवरून वाद झाला. वाद चिघळल्यावर आरोपीने अचानक मोठा दगड उचलून मुकेशच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार प्रहार केला. दरम्यान, भांडण सोडवण्याच्या प्रयत्नात दिनेश धनगर यांनाही दगड लागून ते किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मुकेशला मृत घोषित केले.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली. या खून प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.
या धक्कादायक घटनेमुळे अमळनेर शहरात एकच खळबळ उडाली असून, तंबाखूसारख्या क्षुल्लक कारणावरून जीव घेण्याइतका हिंसाचार वाढत असल्याबाबत नागरिकांत चर्चेला उधाण आले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम