
जळगाव जिल्हा हादरला! दुहेरी महिलांच्या खुनांचा उलगडा; अनिल संदानशिव सूत्रधार
जळगाव जिल्हा हादरला! दुहेरी महिलांच्या खुनांचा उलगडा; अनिल संदानशिव सूत्रधार
अमळनेर (प्रतिनिधी) |पारोळा व अमळनेर तालुक्यातील दोन महिलांच्या निघृण खुनाचा तपास उलगडत गेल्यावर एकच संशयित आरोपी समोर आला असून, दोन्ही प्रकरणांचा सूत्रधार अनिल गोविंदा संदानशिव (रा. सुमठाणे, ता. अमळनेर) असल्याचे अमळनेर पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.
पहिली घटना २५ जून रोजी सुमठाणे (ता. पारोळा) शिवारात घडली होती. शोभाबाई रघुनाथ कोळी (वय ४८, रा. उंदिरखेडे, ता. पारोळा) या घरकाम करणाऱ्या महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी अनिल संदानशिव याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते व त्याच्यावर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसऱ्या घटनेत, २३ जुलै रोजी जानवे (ता. अमळनेर) शिवारात एका अज्ञात महिलेचे आधार कार्ड, चप्पल, कपडे, कवटी व हाडांचे अवशेष सापडले. तपासात ही महिला वैजयंताबाई भगवान भोई (वय ५०, रा. सुरत, मूळ रा. फरकांडे, ता. एरंडोल) असल्याचे स्पष्ट झाले. त्या २ मे रोजी सुरतहून गावी आल्या होत्या व अचानक बेपत्ता झाल्या. याबाबत सुरत पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दोन्ही घटनांतील साम्य हेरून संशयित अनिलची चौकशी केली असता, त्याने वैजयंताबाईचा खून ५ जुलै रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास केल्याची कबुली दिली. दोघांची सूरत येथे ओळख झाली होती व अनिल तिला अमळनेरकडे घेऊन आला होता. त्यानंतर त्याने जानवेच्या जंगलात तिची निर्घृण हत्या केली.
या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिस अधिक तपास करत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम