अमळनेर ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचा निकाल : मुलांकडून निर्वाह भत्ता नाकारला, शेतजमिनीवर अडथळा न आणण्याचा आदेश

बातमी शेअर करा...

अमळनेर ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचा निकाल : मुलांकडून निर्वाह भत्ता नाकारला, शेतजमिनीवर अडथळा न आणण्याचा आदेश

चोपडा प्रतिनिधी ।

अमळनेर उपविभागीय अधिकारी तथा ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणात दाखल झालेल्या एका अर्जावर दिनांक ७ जुलै २०२५ रोजी महत्त्वाचा निर्णय देण्यात आला. या प्रकरणात अर्जदार श्री. सुरेश अवचित पाटील व सौ. लताबाई सुरेश पाटील, दोघे रा. भाई ता. चोपडा यांनी मुलांकडून निर्वाहभत्ता व इतर मागण्या केल्या होत्या.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, अर्जदारांचा मोठा मुलगा महेश सुरेश पाटील यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना आई-वडिलांना निर्वाह भत्ता देणे शक्य नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच अर्जदारांकडे स्वतःचे अर्थाजनाचे साधन असल्यानेही निर्वाहभत्ता मिळण्याची मागणी मान्य करण्यात आलेली नाही.

तथापि, न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देताना सामनेवाले क्रमांक १ ते ६ यांनी अर्जदार दाम्पत्यांना त्यांच्या कुटुंबाच्या गट क्रमांक ६७ मधील शेतजमिनीवर मेहनत-मशागत करण्यास किंवा पिके घेण्यास कोणत्याही प्रकारची अडथळा आणू नये, असा स्पष्ट आदेश दिला आहे.

चोपडा शहरातील गट क्रमांक १०२५ मधील प्लॉट क्रमांक ३२ संबंधी करण्यात आलेल्या खरेदीखत किंवा घराचे बक्षीसपत्र हे ‘वृद्धांचे पालनपोषण करण्याच्या अटीवर’ करण्यात आलेले नसल्याने या बाबत अर्जदारांची मागणी कायद्याअंतर्गत ग्राह्य धरता येणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

याशिवाय, अर्जदारांनी मागितलेले पोलीस संरक्षण देण्याबाबतचा अधिकार या न्यायाधिकरणास नसल्याने ही विनंतीही नाकारण्यात आली. दिलेला निर्णय संबंधीतांना स्वतंत्र डाकमार्गे कळविण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.

या निकालास अर्जदार सहमत नसल्यास, त्यांना ६० दिवसांच्या आत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

अमळनेर उपविभागीय अधिकारी तथा ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाचे अध्यक्ष नितीन मुंडावरे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश प्रसिद्ध करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम