अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

बातमी शेअर करा...

अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला तुरळक पावसामुळे पिकांची वाढ खुंटली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाने तालुक्याची वाटचालच बदलली. या अतिवृष्टीमुळे पांदण रस्ते पूर्णतः खराब झाले असून, जनावरांना व नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. गावांमधील कच्ची घरे कोसळून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत.

शेतकरी बांधवांचे मका, कपाशी व सोयाबीन या प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कपाशीवर बोंडअळी व लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन कोलमडले आहे. मक्याच्या कणसांना दाणे न भरल्याचे आढळले असून, सोयाबीन पिके मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली आहेत. प्रत्यक्षात हिरवेगार दिसणारे वावर पिकांच्या उत्पादनात ८० ते ९० टक्क्यांपर्यंत घट होणार असल्याचे निरीक्षण काँग्रेसने मांडले आहे.

या परिस्थितीत तालुक्यातील पिकांची नजर आनेवारी अवास्तव असल्याचे सांगून ती वास्तव परिस्थितीला धरून कमी करावी, पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीस त्वरित प्रारंभ करावा, तसेच शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

हे निवेदन तालुका काँग्रेसचे पदाधिकारी भागवत केशव सूर्यवंशी व गजेंद्र दत्तात्रय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम