अमळनेर सहकारी बँकेच्या अद्यावत इमारतीचे लोकार्पण 

बातमी शेअर करा...

अमळनेर सहकारी बँकेच्या अद्यावत इमारतीचे लोकार्पण 

सहकारी बँकांनी तरुण, महिला बचत गट यांना व्यवसायासाठी कर्ज देऊन प्रोत्साहन देण्याची गरज- सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

राज्यातील विविध कार्यकारी सोसायट्या संगणकीय प्रणालीसह अद्यावत करणार !

जळगाव  राज्यातील सर्व सहकारी बँकांनी अधिकाधिक शिक्षित युवकांना रोजगाराभिमुख व्यवसाय उभं करण्यासाठी प्रोत्साहन देऊन कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच महिलांचे बचत गट ही प्रचंड मोठी आर्थिक ताकत आहे, त्यांची कर्ज परतफेड करण्याची टक्केवारी विश्वासवर्धक आहे. त्यांना नवनवे व्यवसायिक कौशल्य आत्मसात करायला लावून कर्ज दिले तर कोणतीही सहकारी बँक एन. पी. ए. मध्ये जाणार नाही. वित्तीय क्षेत्रातली सहकार चळवळ पुढे नेण्यासाठी बँकांनी पुढे येऊन नवनवीन कल्पना आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.*

शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या दि. अमळनेर को- ऑप. अर्बन बँकेच्या भव्य अद्यावत इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले.त्यानंतर अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ. अनिल पाटील, माजी आ. साहेबराव पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार, नाशिक विभाग सहकारी संस्थाचे सहनिबंधक संभाजी निकम, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, माजी जि. प. सदस्या सौ. जयश्री पाटील, सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री दिलीप पाटील, अमळनेर सहकारी अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ, अधिकारी, पदाधिकारी, बँकेचे लाभधारक मोठ्याप्रमाणावर उपस्थिती होते.

सहकारी तत्वावर असलेल्या सर्व सोसायटी, पतसंस्था, बँकां यांनी अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून देण्याची गरज विशद करून छोट्या छोट्या होतकरू व्यवसायांना, उद्योगांना कर्ज घेतल्यानंतर ते परत करण्याची संस्कृती रुजविण्याचे काम करावे लागेल तरच एन.पी. ए. मधून बाहेर पडून आपण प्रगती करू असे महत्वाचे विचार सहकार मंत्र्यांनी यावेळी केले.

स्व.यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख यांनी पाहिलेले स्वप्न अमळनेर अर्बन बँकेसारख्या १०० वर्ष काम करणाऱ्या संस्था मुळे राज्यात साकार झाल्याचे सांगून आज सहकारी चळवळीत राज्याने लक्षवेधी प्रगती केली. अमळनेर अर्बन बँकेसारखी पारदर्शक कर्ज व्यवस्था निर्माण केल्यास बँका दिर्घकाळ चांगल्या चालू शकतात. बँकांनी आपल्या प्रगतीच्या चांगल्या गोष्टी समाजास ग्राहक मेळाव्यात जाहीरपणे सांगितले पाहिजे. असेही बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

*पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले,’ ही संस्था ही केवळ आर्थिक व्यवहारांची संस्था नाही, तर गावाच्या नव्या युगाची सुरुवात आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला या संस्थेचा आधार मिळतो आहे आणि त्यामुळे ही संस्था टिकवणं हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे. गावाच्या विकासाची चिंता करणारी माणसं हीच खरी संपत्ती असते. या संस्थेच्या स्थापनेसाठी ज्यांनी दिवस – रात्र मेहनत घेतली, समाजाशी सतत संवाद साधला – त्यांचं कार्य म्हणजे खरं नेतृत्व. ही पतसंस्था म्हणजे केवळ व्यवहार करणारी बँक नाही, तर ग्रामीण समाजाच्या विकासाची, आत्मनिर्भरतेची आणि परस्पर विश्वासाची मुहूर्तमेढ असल्याचे सांगून ही ‘बँक आपल्या दारी’ या तत्त्वावर काम करणारी ही संस्था शेतकरी, महिला बचत गट, लघुउद्योग, युवा उद्योजक यांना नवीन दिशा देईल. बँक म्हणजे फक्त व्यवहार नव्हे, बँक म्हणजे विश्वास आणि आज इथल्या नेतृत्वाने तो विश्वास जिंकलेला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ही संस्था पारदर्शकतेच्या आणि लोकाभिमुखतेच्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करेल.*

आ.अनिल पाटील यांनी आपल्या म्हणाले, ‘अमळनेर सारख्या ग्रामीण भागात लोकांना आर्थिक पातळीवर अर्बन बँकेने केलेले कार्य मोलाचे आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीची माहिती देत सभासदांचे ऋण चेअरमन पंकज मुंदडे यांनी व्यक्त केले. ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते फलकाद्वारे सभासदांसाठी १०% लाभांश जाहीर करण्यात आला तर अमृत धनसंचय योजना आ.अनिल पाटील यांचे हस्ते जाहीर करण्यात आली. याप्रसंगी व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी शतक महोत्सवी वर्षानिमित्त सर्वसामान्य सभासद व जेष्ठ नागरीक यांच्यासाठी अमृत धनसंचय १०० योजनेची माहिती देत उपस्थितांचे आभार मानले. सदर समारंभात बँकेचे जेष्ठ सभासद, ठेविदार, कर्जदार यांचा सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम