अरुणभाई गुजराथींच्या हाती पुन्हा ‘घड्याळ’; आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

बातमी शेअर करा...

अरुणभाई गुजराथींच्या हाती पुन्हा ‘घड्याळ’; आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

चोपडा (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आज राजकीय पवित्रा बदलत शरद पवार गटाला सोडचिट्टी देत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विशेष कार्यक्रमात ते अधिकृतरित्या पक्षप्रवेश करणार आहेत.

राज्यातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये सुरु असलेल्या सत्तासमीकरणांच्या पार्श्वभूमीवर अरुणभाईंचा हा निर्णय मोठ्या राजकीय घडामोडीचा भाग मानला जात आहे. एकेकाळी शरद पवार यांचे खंदे समर्थक, निष्ठावान सहकारी आणि पक्षाचे शिस्तप्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे गुजराथी यांनी पक्ष बदलण्यामागे स्थानिक कार्यकर्त्यांचे राजकीय भविष्य सुरक्षित ठेवण्याची भूमिका मांडली आहे.

पत्रकारांशी बोलताना अरुणभाई गुजराथी म्हणाले, “मी हा निर्णय माझ्या कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करून घेतला आहे. आजच्या राजकीय परिस्थितीत विकास आणि स्थिरतेसाठी अजितदादा पवार यांच्यासोबत जाणेच योग्य ठरेल. त्यांनी केलेली कामगिरी आणि विकासाभिमुख धोरणं मला पटली आहेत.”

चोपडा शहर व परिसरातील कार्यकर्त्यांचा मोठा जत्था त्यांच्या सोबत मुंबईकडे रवाना झाला असून, आज दुपारपर्यंत अजित पवार यांच्या उपस्थितीत अरुणभाई गुजराथी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गटात) प्रवेश करणार आहेत. या प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

राजकीय निरीक्षकांच्या मते, गुजराथींचा पक्षप्रवेश हा अजित पवार गटासाठी उत्तर महाराष्ट्रात मोठा “मनोबलवर्धक” ठरणार असून, शरद पवार गटासाठी ही एक मोठी धक्का देणारी घटना ठरू शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम