अविवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ;  खोटेनगर परिसरातील घटनेने हळहळ

बातमी शेअर करा...

अविवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ;  खोटेनगर परिसरातील घटनेने हळहळ

जळगाव, : जळगाव शहरातील खोटेनगर परिसरातील वाटिकाश्रम भागात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अविवाहित ३८ वर्षीय महिलेने घराच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पल्लवी सुभाष सपकाळे (वय ३८) असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घरात त्या वेळी कुणीही नसल्याचा फायदा घेत पल्लवी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

घटना कशी घडली?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पल्लवी सपकाळे या आपल्या आई प्रमिला सपकाळे आणि भाऊ हर्षल सपकाळे यांच्यासोबत राहत होत्या. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी रेल्वे विभागात नोकरीस जाणाऱ्या भावासाठी जेवणाचा डबा करून दिला. त्यानंतर त्यांच्या आई भाजीपाला घेण्यासाठी बाहेर गेल्या. घरात कोणतीही व्यक्ती नसल्याने पल्लवी यांनी दुपारी घराच्या छताला असलेल्या पंख्याला गळफास घेतला.

आई प्रमिला सपकाळे या घरी परतल्यानंतर मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली आणि त्यांनी एकच आक्रोश केला. शेजाऱ्यांच्या मदतीने पल्लवी यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

पल्लवी सपकाळे यांनी आत्महत्या का केली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. घटनेची नोंद करण्याचे काम तालुका पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होते.

या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम