
अवैध दारूच्या अड्ड्यावर गोळीबार करून पसार झालेले दाम्पत्य अखेर जेरबंद
अवैध दारूच्या अड्ड्यावर गोळीबार करून पसार झालेले दाम्पत्य अखेर जेरबंद
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातील अवैध दारूच्या अड्ड्यावर रविवारी रात्री झालेल्या गोळीबारानंतर पसार झालेले आरोपी दाम्पत्य अखेर पोलिसांच्या हाती सापडले. नांदूरा गावाजवळ पोलिसांनी सापळा रचून आरोपी राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय ३५) आणि त्याची पत्नी मोनाली राहुल बऱ्हाटे (वय ३०, दोघे रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांना अटक केली.
या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या राजन शेख रफिउल्ला याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुसरा कामगार अहमद फिरोज शेख याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. घटनेनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींविरोधात कठोर कारवाई सुरु केली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसीतील जी-१४ सेक्टरमध्ये काम करणारे उत्तरप्रदेशातील फिरोज शेख, राजन शेख व इतर काही मजूर हे विजेते कंपनीत कार्यरत आहेत. कंपनीपासून काही अंतरावर आरोपी राहुल बऱ्हाटे याची पानपटरी असून, तो तेथे बेकायदेशीररीत्या दारू विक्री करत होता. रविवारी रात्री दहाच्या सुमारास सरफू अहमद हा पुडी घेण्यासाठी गेला असता, राहुलने त्याला मारहाण केली. हा प्रकार थांबवण्यासाठी कंपनीतील काही कामगार तेथे गेले असता, त्याची पत्नी मोनाली स्कुटरवर तेथे पोहोचली. तिने राहुलच्या हातात गावठी पिस्तुल दिले आणि त्यानंतर राहुलने कामगारांवर गोळीबार केला.
गोळीबारात राजन शेख याला किडनीजवळ गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. अहमद फिरोज शेख हाही गंभीर जखमी झाला. दोघांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सोमवारी दुपारी राजनचा मृत्यू झाला.
गोळीबारानंतर आरोपी दाम्पत्य दुचाकीवरून नांदूराच्या दिशेने पसार झाले. मात्र, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शोध पथकाने तातडीने पाठलाग सुरू केला. उपनिरीक्षक राहुल तायडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला आरोपींचा ठावठिकाणा मिळाल्यानंतर नांदूरा चौफुलीजवळ सापळा रचण्यात आला आणि दोघांना जेरबंद करण्यात आले.
दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दि. १० नोव्हेंबरपर्यंत सुनावली आहे. आरोपी राहुल बऱ्हाटे याच्याविरुद्ध आधीच आठ ते दहा गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या संपूर्ण कारवाईत गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, प्रदीप चौधरी, किरण चौधरी, गणेश ठाकरे, नितीन ठाकूर, शशिकांत मराठे, किरण पाटील आणि गिरीष पाटील यांनी सहभाग घेतला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम