
अवैध दारू विक्रीवर कारवाई टाळण्यासाठी १० हजारांची लाच ; उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक रंगेहाथ अटकेत
अवैध दारू विक्रीवर कारवाई टाळण्यासाठी १० हजारांची लाच ; उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक रंगेहाथ अटकेत
खासगी पंटरसह एसीबीची धडक कारवाई, रावेर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव : अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी तसेच दारूबंदी कायद्यान्वये कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक विजय भास्कर पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यासोबत लाच स्वीकारणारा खासगी पंटर भास्कर रमेश चंदनकर यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवार दि. १७ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास रावेर तालुक्यात करण्यात आली असून, प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदाराच्या वडिलांवर यापूर्वी दारूबंदी कायद्यान्वये कारवाई झालेली असताना, पुढे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी तसेच कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी दुय्यम निरीक्षक विजय पाटील याने दरमहा पंधराशे रुपये याप्रमाणे बारा महिन्यांसाठी एकूण अठरा हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यातील पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रारदाराने दि. १७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी दुय्यम निरीक्षक विजय पाटील याचा खासगी पंटर तथा चालक भास्कर चंदनकर याने तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने तात्काळ छापा टाकत दोघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या दुय्यम निरीक्षक विजय भास्कर पाटील (वय ५१, मूळ रा. उहा, ता. मोताळा, जि. बुलढाणा, सध्या रा. खानापूर, ता. रावेर) व खासगी पंटर भास्कर रमेश चंदनकर (वय ४३, रा. खानापूर, ता. रावेर) यांच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस नाईक बाळू मराठे व भूषण पाटील यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम