अवैध शिकारीचा डाव उधळला; वैजापूर वन परिक्षेत्रात दोन मोटरसायकली जप्त

बातमी शेअर करा...

अवैध शिकारीचा डाव उधळला; वैजापूर वन परिक्षेत्रात दोन मोटरसायकली जप्त

वैजापूर ता. यावल l प्रतिनिधी यावल वन विभागाच्या वैजापूर वन परिक्षेत्रातील जंगलात शिकार करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या अज्ञात इसमांचा डाव वन विभागाच्या पथकाने सतर्कतेमुळे उधळून लावला. गावठी बंदुकीच्या फायरचा आवाज ऐकून त्वरीत हालचाल करत पथकाने पाठलाग केला आणि घटनास्थळी सोडून दिलेल्या दोन मोटरसायकली जप्त केल्या. सुदैवाने कोणत्याही वन्यजीवाला या घटनेत इजा झाली नाही.

१६ मे २०२५ रोजी सकाळी १० ते १८ मेच्या रात्री ११.३० वाजेपर्यंत वन विभागाचे पथक कक्ष क्रमांक २२६, २२५, २२३ व २३२ या परिसरात नियमित गस्त घालत होते. दरम्यान, कक्ष क्रमांक २३२ मध्ये बंदुकीचा आवाज ऐकू आल्याने पथकाने तत्काळ त्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी काही अज्ञात इसम गावठी बंदुकीसह दिसून आले. वन कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच त्यांनी लपवलेल्या दोन मोटरसायकली घटनास्थळी सोडून दऱ्याखोऱ्यांचा आधार घेत पलायन केले.

सदर इसम परप्रांतीय असून, त्यांनी राखीव वन क्षेत्रात अनधिकृतपणे प्रवेश करून शिकार करण्याचा प्रयत्न केला होता, असे वन विभागाने स्पष्ट केले. वन पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केली असता, कोणत्याही वन्यजीवाला हानी पोहोचलेली नसल्याचे निष्पन्न झाले.

जप्त केलेल्या दोन्ही मोटरसायकली शासकीय वाहनाद्वारे चोपडा येथील शासकीय आगारात जमा करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१)(ड), (आय), महाराष्ट्र वन नियमावली ९ तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ आणि ५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वनपाल, वैजापूर यांनी यासंदर्भात गुन्हा क्रमांक डब्ल्यू२/२२/५/२०२५ दाखल केला आहे.

ही कारवाई वनपाल आय. एस. तडवी, संदीप भोई, चुनिलाल कोळी, बाजीराव बारेला, भारसिंग बारेला, संदीप ठाकरे, निखिल माळी, हर्षल पावरा, गणेश बारेला आणि विजय शिरसाठ यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली. या मोहिमेचे मार्गदर्शन धुळे प्रादेशिक वनसंरक्षक नीनु सोमराज, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे व समाधान पाटील, तसेच वैजापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकेश ठाकरे यांनी केले.

वनपरिक्षेत्र अधिकारी विकेश ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, अवैध शिकार, वृक्षतोड, वनवा, अतिक्रमण किंवा कोणताही वन गुन्हा निदर्शनास आल्यास तात्काळ महाराष्ट्र वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम