
असोदा शिवारात वीटभट्टीजवळ अडीच ते तीन महिन्यांच्या बालिकेचा कुजलेला मृतदेह आढळला
असोदा शिवारात वीटभट्टीजवळ अडीच ते तीन महिन्यांच्या बालिकेचा कुजलेला मृतदेह आढळला
जळगाव (प्रतिनिधी): शहरापासून जवळ असलेल्या असोदा शिवारात रविवारी सकाळच्या सुमारास एका वीटभट्टीजवळ अडीच ते तीन महिन्यांच्या बालिकेचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान नगर येथील रहिवासी अशोक पुंडलिक कुंभार (वय ४३) यांची वीटभट्टी असोदा शिवारात संजू हरि ढाके यांच्या शेतामध्ये आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने भट्टीवरील काम बंद आहे व कामगारही दोन महिन्यांपूर्वीच निघून गेले आहेत. अशोक कुंभार हे नेहमीप्रमाणे रविवार, १३ जुलै रोजी सकाळी विटा भरण्यासाठी भट्टीवर गेले असता, त्यांना वीटभट्टीच्या एका कोपऱ्यात कुजलेल्या अवस्थेतील एका अज्ञात चिमुकलीचा मृतदेह आढळला.
चेहरा विद्रूप, डोळे बाहेर आलेले, डावा पाय तुटलेला
मृत बालिकेचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झालेला होता तसेच डोळे बाहेर आलेले होते. विशेष म्हणजे डावा पाय गुडघ्यापासून पूर्णपणे तुटलेला होता. ही दृश्ये अत्यंत विचलित करणारी होती. घटना लक्षात येताच अशोक कुंभार यांनी तातडीने गावातील पोलीस पाटील आनंदा बिन्हाडे व बाळू पाटील यांना माहिती दिली. त्यांनी लगेचच तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक तपास सुरू असून, अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम