
अॅन्टी रॅगींग सप्ताहास सुरूवात विविध उपक्रमांचे आयोजन
अॅन्टी रॅगींग सप्ताहास सुरूवात विविध उपक्रमांचे आयोजन
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ; जनजागृतीपर रॅली
जळगाव, – डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये रॅगींगविषयी जागृती निर्माण करण्यासाठी अॅन्टी रॅगींग सप्ताहाची सुरुवात १२ ऑगस्ट रोजी करण्यात आली. या आठवडाभर चालणार्या उपक्रमांचा उद्देश महाविद्यालय परिसरात रॅगींगला पूर्णविराम देणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्नेह, आदर आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा आहे.
सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. बापूराव बिटे यांनी अॅन्टी रॅगींग डे निमित्त मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी रॅगींगच्या सामाजिक, मानसिक आणि शैक्षणिक परिणामांवर प्रकाश टाकत, प्रत्येक विद्यार्थ्याने परस्पर सन्मान आणि सौहार्द जपण्याचे आवाहन केले. रॅगींग हा केवळ कायद्याने दंडनीय गुन्हा नसून तो मानवतेच्या मूल्यांना हरवणारा कृत्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सप्ताहात विविध उपक्रम
अॅन्टी रॅगींग सप्ताहात १३ ऑगस्ट रोजी सेमिनार घेण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी मार्गदर्शन करतांना कायदेशीर तरतुदी, विद्यार्थी हक्क आणि रॅगींगविरोधी उपाययोजना याबाबत माहिती दिली. १४ ऑगस्ट रोजी शॉर्ट फिल्म प्रदर्शन होणार असून, त्याद्वारे रॅगींगमुळे होणारे परिणाम प्रभावी पद्धतीने दाखवले जातील. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली काढण्यात येईल. महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सहभागाने ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढली जाईल, ज्यात रॅगींग बंद करा – मैत्री वाढवा अशा घोषणांनी वातावरण दुमदुमेल. १६ ऑगस्ट रोजी पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पोस्टर्समधून रॅगींगविरोधी संदेश मांडले जातील. १७ ऑगस्ट रोजी स्लोगन सादरीकरण स्पर्धा होणार असून, लघु पण प्रभावी घोषवाक्यांद्वारे जागृती घडवली जाईल. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, १८ ऑगस्ट रोजी निबंध लेखन होणार आहे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी सांगितले की, अॅन्टी रॅगींग सप्ताह हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल घडविण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे परस्पर विश्वास, आदर आणि स्नेहपूर्ण वातावरणाची निर्मिती होईल. कार्यक्रमाचे संयोजन अॅन्टी रॅगींग समितीच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. या अॅन्टी रॅगींग सप्ताहामुळे महाविद्यालयात सुरक्षित, सकारात्मक आणि रॅगींगमुक्त वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. माया आर्विकर, डॉ. विलास चव्हाण, सुरेंद्र गावंडे, अर्चना भिरूड, ज्योत्स्ना भिरूड यांच्यासह समिती सदस्य व विद्यार्थी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम