
आंतरमहाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाला सुरुवात
आंतरमहाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाला सुरुवात
जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड मॅनेजमेंट, जळगाव आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाला आज बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित देशभक्तिपर ‘आनंद मठ’ या नाटकाच्या प्रभावी प्रयोगाने सुरूवात करण्यात आली. या नाटकाचे बंकिमचंद्र चटोपाध्याय रंगमंच क्रमांक १ येथे सादरीकरण करण्यात आले.
विनिता तेलंग लिखित आणि रवींद्र सातपुते दिग्दर्शित “आनंदमठ” हे मराठी संगीत नाटक बंकिमचंद्र चटर्जी यांच्या सुप्रसिद्ध बंगाली कादंबरी ‘आनंदमठ’ वर आधारित आहे. यंदा या कादंबरीच्या प्रकाशनाला १५० वर्षे पूर्ण होत असून, त्याच संकल्पनेवर आधारित हे नाट्य विशेष सादरीकरणासाठी “युवारंग” महोत्सवासाठी निवडले गेले आहे. विद्यार्थ्यांची नावनोंदणी पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता, हे मराठी संगीत नाटक जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ‘बंकिमचंद्र चटोपाध्याय सभागृह’ रंगमंच क्रमांक १ येथे सादर करण्यात आले.
या नाटकातून १८व्या शतकातील संन्यासी बंडाची झलक दाखवत देशसेवा, त्याग आणि एकतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देवून देशभक्तीमय वातावरण निर्माण केले. कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि संवादांनी उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला. लेखक सौ. विनिता तेलंग, दिग्दर्शक रवींद्र सातपुते, संगीत अजय पराड, नेपथ्य जयंत टोले, रंगभुषा अरविंद सुर्य यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे यांनी प्रास्ताविक करताना राष्ट्रकवी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी रचना केलेल्या वंदे मातरम् पासून सर्व क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली आहे. युवक महोत्सवाला थीम देऊन साजरा करण्याचा पहिला प्रयोग आपल्या विद्यापीठाने केला. याची दखल घेत महामहीम राज्यपाल यांनी पत्रक काढून अशा पद्धतीने युवक महोत्सव साजरा करण्याचे आदेश सर्व विद्यापीठांना दिले. ही बाब आपल्यासाठी गौरवास्पद असल्याचे सांगत त्यांनी मागील युवक महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली.
यावेळी कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी इंगळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, युवारंगचे कार्याध्यक्ष नितीन झाल्टे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य महेंद्रसिंग रघुवंशी, प्रा. पवित्रा पाटील, प्राचार्य अनिल राव, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. प्रीती अग्रवाल, प्रा. संजय शेखावत, अधिसभा सदस्य दीपक बंडू पाटील, नितीन ठाकूर, स्वप्नाली महाजन – काळे, संदीप नेरकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, प्रा. अजय पाटील, प्रा. दीपक दलाल, प्रा. किशोर पवार, रायसोनी एज्युकेशन चे पदाधिकारी, जळगावचे नागरिक तसेच युवक महोत्सवासाठी उपस्थित कलावंत विद्यार्थी उपस्थित होते

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम