आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसोबत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

बातमी शेअर करा...

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसोबत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

जळगाव (प्रतिनिधी)  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दिवाळी सणाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसोबत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून भारतीय परंपरेतील एकात्मता, संस्कृतीचे वैभव आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांशी स्नेहबंध दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस टी इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील तसेच विद्यापीठ प्रशाळेतील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रसंगी कुलगुरूंनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात दिवाळी सणाचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी भारतीय संस्कृतीतील ‘अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा’ संदेश अधोरेखित करत सर्व विद्यार्थ्यांना सद्भावना, बंधुता आणि प्रगतीचा संदेश दिला. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय दर्जा अधिक वृद्धिंगत झाल्याचे कुलगुरूंनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी देखील या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी भारतीय संस्कृती, उत्सवांची समृद्ध परंपरा आणि विद्यापीठातील शिक्षण तसेच राहणीमानातील उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी विशेषतः विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरूंच्या मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कक्षाचे समन्वयक डॉ. एस. एस. घोष यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी पारंपरिक दिवाळी सजावट, दिवे प्रज्वलन आणि सांस्कृतिक आदानप्रदानाच्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला.

विद्यापीठात सध्या एकूण चार आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी दोन विद्यार्थी या विशेष दिवाळी कार्यक्रमात सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये श्री. ऑदित्या कुमार सिंग रॉय (बांगलादेश) – B.Sc. Computer Science अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहेत, तसेच श्री. थॉमस हेसेक (Tomas Hesek, ,झेक प्रजासत्ताक) – (Three-Month Research Program) मध्ये सहभागी झालेले आहेत.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले. त्यांनी विद्यापीठातील सुव्यवस्था, शैक्षणिक वातावरण आणि सांस्कृतिक अनुभवाबद्दल समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम भारतीय परंपरा आणि आंतरराष्ट्रीय मैत्रीचे एक सुंदर प्रतीक ठरला असून, अशा उपक्रमांमुळे विद्यापीठातील बहुसांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम