
आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ; सरकार–विरोधकांमध्ये अजेंड्यांवरून चुरस
आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ; सरकार–विरोधकांमध्ये अजेंड्यांवरून चुरस
नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन आज, सोमवारपासून सुरू होत असून आगामी १९ दिवसांच्या सत्रात सरकार सुधारणा-विषयक विधेयकांचा आपला अजेंडा पुढे नेण्यास सज्ज आहे. विशेषत: नागरी अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं करण्यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण विधेयकावर सरकारची नजर आहे. दुसरीकडे, विरोधकांनी मतदार याद्यांच्या सखोल फेरतपासणी (एसआयआर), लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरण, परराष्ट्र धोरण, प्रदूषण आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून व्यापक चर्चेची मागणी करत सत्र तापविण्याची रणनीती आखली आहे.
हे अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान होणार असून प्रत्यक्ष कामकाजासाठी केवळ १५ दिवस उपलब्ध असतील. या अत्यंत अल्प कालमर्यादेवर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला असून रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही हा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. ही बैठकही केवळ औपचारिकता ठरत असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी करत सरकारवर निशाणा साधला.
काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने संसदीय परंपराच कमकुवत केल्याचा आरोप करत, अवघ्या १५ दिवसांचे हे हिवाळी अधिवेशन संसदेच्या इतिहासातील सर्वात लहान अधिवेशन ठरेल, असे सांगितले. देशातील राष्ट्रीय सुरक्षा, एसआयआर, प्रदूषण, शेतकरी प्रश्न, तसेच परराष्ट्र धोरण यावरील गंभीर चर्चेतून सरकार पळ काढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी अधिवेशन सुरळीत आणि फलदायी पार पडावे यासाठी सरकार बांधिल असल्याचे सांगत सर्व पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम