
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी २४ शिक्षकांच्या मुलाखती
जळगाव: जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत दरवर्षी दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड केली जात असून, यंदा या पुरस्कारासाठी एकूण २४ शिक्षकांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.
२१ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिनल करणवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने इच्छुक २४ शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक कार्याचे आणि राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांचे सादरीकरण समितीसमोर केले.
मुलाखत घेणारी समिती
या मुलाखती घेणाऱ्या समितीत सीईओ मिनल करणवाल यांच्यासह प्राथमिक शिक्षणाधिकारी परदेशी, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, समाज कल्याण अधिकारी विनोद चावरीया, डायटचे प्राचार्य आणि मुख्य लेखा अधिकारी बाबुलाल पाटील यांचा समावेश होता.
मुलाखत झालेल्या शिक्षकांची अंतिम यादी विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. आयुक्तांकडून यादीला मान्यता मिळाल्यानंतर पुरस्कारार्थींची घोषणा केली जाईल. शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) या पुरस्कारांचे वितरण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून सुरू असले तरी, कार्यक्रमाची नेमकी तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम