आदिवासींच्या मुलभूत मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘बिऱ्हाड मोर्चा’

बातमी शेअर करा...

आदिवासींच्या मुलभूत मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘बिऱ्हाड मोर्चा’
लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन सादर

जळगाव (प्रतिनिधी) – जमिनीवरील हक्क, घरकुल, रेशन, जातीचे दाखले, शिक्षण व रोजगार अशा मूलभूत अधिकारांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘बिऱ्हाड मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी केले.

खानदेश मॉल येथून निघालेल्या या मोर्चाने टॉवर चौक, जुना बस स्थानक, जीएस ग्राउंड, नवीन बस स्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात आदिवासी बांधव, महिलावर्ग, शेतकरी, विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. या सांस्कृतिक उपस्थितीमुळे मोर्चाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली.

मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. विशेषतः हरी हुडकोसारख्या शहरातील परिसरात घराखालील जागा संबंधित घरमालकांच्या नावे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, ग्रामीण भागात गावठाण जागांचे सर्वेक्षण करून गरजूंना घरासाठी जागा मिळावी, तसेच गावपातळीवर जातीचे दाखले मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

यासोबतच येत्या मंगळवारी ग्रामीण भागात आधार कार्ड शिबिरे आयोजित करून नवीन रेशनकार्ड तयार करण्याची मोहिम राबवली जाणार असून, मासेमारीच्या परवानग्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याचे प्रशासनाने मान्य केले असल्याची माहिती प्रतिभा शिंदे यांनी यावेळी दिली.

मोर्चाच्या वेळी महापालिकेच्या उपायुक्त धनश्री शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सचिन धांडे, कैलास मोरे, राणा चौव्हाण, सुनील मोरे, शंकर भिल, उत्तम भिल, गणेश सूर्यवंशी, वादा भिल, नरेश चव्हाण, ताराचंद बारेला, इरफान तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.

या सर्व मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शिष्टमंडळाला दिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम