
आधुनिक भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल
आधुनिक भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल
दिवस निघून गेले तरी आठवणी कायम असतात प्रत्येक क्षणी त्या मात्र फुलांप्रमाणे ताज्या असतात आजही ७५ वर्ष जाऊन झालेत तरी सरदार वल्लभभाई पटेलांच्या आठवणी मात्र ताज्या आहेत. खरं तर आपली भारतभूमी नररत्रांची खाण आहे, यात अगणित प्रतिभाशाली नरवर जन्माला आले आणि त्यांनी भारत मातेला समृद्ध केले. गुजरातच्या भूमीवर अशाच एका महान पोलादी पुरुषाचा जन्म लेवा पाटीदार जातीत पटेल घराण्यात ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी नडियाद येथे मातृगृही झाला. त्यांचे मुळ गाव गुजरात राज्यात खेडा जिल्ह्यातील करमसद हे होय. पटेलांच घराणे शेतकऱ्याचं होतं, १० एकर शेती असलेल्या अस्सल शेतकऱ्याचा हा कर्तबगार मुलगा. पटेल समाज मुळ पंजाबातील पण उद्योगधंद्याच्या निमित्ताने गुजरातमध्ये आलेत. तेथील सुपीक जमीन बघून त्याच ठिकाणी स्थायिक झाले. शेतीशी नात जोपसणारा हा समाज नंतर गरजेनुसार परिस्थितीनुसार गुजरात मधून सर्व भारतात पसरला. त्यांचे वडील झव्हेरभाई व आई लाडाबाई, वडील धाडसी व साहसी होते तोच वारसा सरदार पटेलांनी पुढे चालू ठेवला.
प्राथमिक शिक्षण करमसद येथे घेऊन पुढील शिक्षण पेटलाद, बडोदा व नडियाद येथे घेतले. विद्यार्थी दशेतच १८ वर्षाचे असतांनाच त्यांचे १८९३ ला झव्हेरवेन यांच्या सोबत लग्न झाले. १८९७ ला नडियादहून ते मॅट्रीक परीक्षा पास झाले, घरच्या गरीबीमुळे महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. परंतु सरदारांना शिकत असतांनाच ‘बडी आसामी’ व्हायचं होत. त्याकाळी वकिली ही ‘बडी आसामी’ मानली जात होती.
सहावीत असतांना त्यांच्या पारशी शिक्षकाने एका विद्यार्थ्याला दंड केला, तो दंड विद्यार्थ्याने दुसऱ्या दिवशी आणला नाही म्हणून त्याला वर्गातून बाहेर हाकलले. वास्तविक शिस्तीच्या दृष्टीने पाहिले तर यात काय चूक होती? आजकाल तर छड्या मारण्याऱ्या शिक्षकालाच गावकरी बेदम ठोकतात. त्या विद्यार्थ्याला बाहेर काढल्याबरोबर सरदार पटेलांनी सर्व विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर यावयास सांगितले. त्या मास्तरालाच सरदार धडा शिकवणार होते. त्यांनी तो वर्गच काय तर सारी शाळाच तीन दिवस बंद पाडली. हरताळ यशस्वी झाला. मुख्याध्यापकांनी वल्लभभाईना बोलावून घेतले व यापुढे कोणत्याही विद्यार्थ्याला अन्यायाने व जास्त रकमेच्या दंडाची शिक्षा केली जाणार नाही असे सांगितले. यातूनच सरदार पटेलांची अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती आणि नेतृत्व गुण लहानपणापासून दिसून येतो. पुढे इंग्रजांविरुद्ध लढण्याची ही रंगीत तालीम होती कि काय असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.
एकदा ते आजारी पडलेत त्यांच्या काखेत गाठ झाली, ती अतिशय कडक होती त्याकाळी अशी गाठ झाली तर गावातील वैद्य तापलेल्या लोखंडी सळईने जाळून टाकीत असे. झव्हेरभाई व लाडाबाई त्यांना वैद्याकडे घेऊन गेल्यात. वैद्याने सांगितलं की ती गाठ जाळावी लागेल तेव्हा त्यांचे वय लहान होते. झव्हेरभाईनी सुद्धा हो सांगितले. वैद्याने सळई तापवली पण लहान वयातल्या वल्लभभाईना बघितल्यावर वैद्याची हिम्मत होईना. त्यांचे हात थरथर कापत होते. ती परिस्थिती वल्लभभाईंच्या लक्षात आली आणि लगेच ते वैद्याला म्हणाले, ‘अहो वैद्यबुवा! ही गाठ जाळल्याशिवाय बरी होणार नसेल तर मग तुम्ही कसला विचार करता? अहो सळई तापलेली आहे जाळून टाका गाठ, वैद्यबुवांची काही हिम्मत होईना. त्यांना वैद्याचा राग आला आणि वैद्याच्या हातातील तापलेली सळई स्वतः आपल्या हाताने काखेतील गाठीवर ठेवली आणि चर्रचर्र आवाज झाला. आईला तर हे अश्रु आवरत नव्हती. लहान वयातील वल्लभभाईंचे धाडस काय सामान्य नव्हते. हाच धाडसी गुण शेवटपर्यंत त्यांनी राखून ठेवला त्यामुळे आयुष्यभर भारतमातेवर येणाऱ्या संकटांवर नेहमीच ते मात करत गेलेत.
१८९७ मध्ये मॅट्रीक परीक्षा पास झाल्यावर पुढे काय ? तर त्यांना कायद्याचा अभ्यास करायचा होता, परिस्थिती गरिबीची असल्यामुळे पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत नव्हते. त्यावेळी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन वकिलीतून पैसे मिळवून बॅरिस्टर होण्याची जबरदस्त महत्वाकांक्षा होती. त्याकरिता कर्ज काढाव लागले पण दुर्दैव अस गोधराला प्लेग सुरू झाला. त्यांच्या सोबत कोर्टात काम करण्याऱ्या मित्राच्या मुलाला प्लेगने गाठले. त्या मुलाची सूश्रूषा करायला ते त्याच्या घरी जायचेत. केवढी आपले पणाची भावना म्हणावी लागेल. शेवटी तो मुलगा मरण पावला. लगेच सरदार पटेलांना स्मशाणातून परत आल्यावर प्लेगने झपाटले. त्यांनी पत्नीला करमसदला पोहोचविले व स्वतः नडियादला प्लेगला बरोबर घेऊन गेलेत. तेथे एकटेच राहिले आणि रोगमुक्त झाले. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष वकिली केल्यानंतर गोधरा सोडले आणि बोरसदला वकिली सुरु केली. बोरसद म्हणजे गुन्हेगारांची पंढरीच. १९०८ च्या अखेरीस सरदारांवर कौटुंबिक आपत्ती कोसळली त्यांच्या पत्री आजारी पडल्या व त्यांना मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये आतड्याचा विकारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई येथे ठेवले. परंतू तब्बेतीत सुधारणा झाल्याशिवाय शस्त्रक्रिया करता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले, पत्नीला तेथेच ठेवले सर्व व्यवस्था केली व आनंदला एक खून खटला चालविण्यास परतले. शस्त्रक्रियेसाठी तारीख ठरली म्हणजे मला तार करा असेही सांगून ठेवले. ११ जानेवारी १९०९ रोजी त्या वारल्या. मृत्युची तार आली तेव्हा सरदार पटेल आनंद येथे कोर्टात खुनाचा खटला चालवित होते. खटला ऐन मोक्याच्या अवस्थेत आला होता तेव्हाच तार आली सरदारांना ती तार वाचून धक्का बसला, त्या वेळी जर कोर्टाला सांगितलं असत तर खटला तहकूब झाला असता, खटल्याची साखळी तुटली असती तर खटला अंगलट आला असता. त्यांचा पक्षकार फासावरही लटकला असता. सरदारांनी तार खिशात ठेवली, दुःख गिळले, मन खंबीर केले व उलट तपासणी संपवली. कोर्टातील काम पूर्ण होईपर्यंत त्यांनी तारेतील मजकूर कोणालाही कळवला नाही. त्यावेळी सरदारांचे वय ३३ वर्षांचे होते. यावरुन सरदार वल्लभभाई पटेल महासंयमी पुरुष होते अशी ओळख त्यांची प्रकषनि जाणवते.
त्यानंतर वर्षानंतर बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले कारण बॅरिस्टर् होणे त्यांचे स्वप्न होते आणि तिथेही रोमन लॉ ची परीक्षा दिली व पहिला क्रमांक मिळविला. त्यांना ५० पाउंडच पारितोषिक मिळाले. १९१३ मध्ये ते परत आले व अहमदाबादला वकिली सुरु केली. त्यावेळी महात्मा गांधी आले व गांधीजींच्या सहवासाने पूर्णतः ते बदलले. १९१७ साली महात्मा गांधी गुजरात सभेचे अध्यक्ष तर पटेल चिटणीस होते.
खेडा सत्याग्रहः महात्मा गांधी आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अन्यायी सारा वसुलीच्या विरोधात केलेले सामुहिक आंदोलन खेडा सत्याग्रह म्हणून प्रसिद्ध आहे. खेडा जिल्ह्यात १९१८ मधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकांना प्रचंड नुकसान झाले होते. चौथाई भागसुद्धा शेतीतून ते मिळवू शकले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली, त्यातच इंग्रज सरकारने सारावसुली सुरू केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. ब्रिटिश शासनाच्या कायद्यानुसार पंचवीस टक्क्यांपेक्षा उत्पन्न कमी झाले असेल, तर साऱ्यात सवलत होती. अनेक शेतकऱ्यांनी या प्रकरणी सरकारकडे एक याचिका दाखल केली याचा उद्देश होता. सरकारकडून सारा वसुलीस मुदतवाढ मिळावी अशी मागणी होती. परंतु सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि गावांमध्ये ४८ टक्के उत्पन्न झाल्याचे घोषित केले. पण उरलेल्या ५०० खेड्यांत काहीच पिकले नव्हते. तरीसुद्धा सरकारने जबरदस्तीने सारावसुली सुरूच ठेवली. म्हणूनच महात्मा गांधी यांनी वल्लभभाई पटेलांना शेतकऱ्यांच्या या समस्यांमध्ये पुढाकार घेण्यास सांगितले. गांधी आणि पटेलांनी शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकविण्यासाठी जिह्यातील ६०० खेड्यांपैकी ४२५ खेड्यांत गांधी-पटेलांनी पदयात्रा काढली. पटेल यांनी शेतजमिनींवार भेटी देऊन पिकांची पाहणी केली आणि वस्तुस्थिती सरकारच्या निदर्शनास आणून दिली. सरकार तरीही मागण्या मान्य करायला तयार नव्हते. तेव्हा महात्मा गांधी यांनी २२ मार्च १९१८ रोजी खेडा सत्याग्रहाची घोषणा केली. नंतर सरदार पटेलांनी शेतकऱ्यांना संघटित करून सांगितले कि, ‘येतील त्या हालअपेष्टांना तोंड द्या, पण सारा भरू नका.’ अश्या पद्धतीने सरदार पटेलांनी सारावसुलीस ठामपणे विरोध केला. तेव्हा इंग्रज सरकारने जुलूम-जबरदस्ती केली. आंदोलन दडपण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, मालमत्ता यांवर जप्ती आणली. जप्त केलेल्या शेतजमिनीतील पीक काढून घेतल्याबद्दल सरकारने अनेक शेतकऱ्यांना तुरुंगात डांबले. तरीही शेतकऱ्यांनी शांततापूर्ण मागनि सरकारचा निषेध करत हे आंदोलन सुरूच ठेवले. दिवसेंदिवस या सत्याग्रहाची व्याप्ती वाढ लागल्याने. अखेर इंग्रज सरकारने नमते घेऊन सारावसुलीत सूट दिली आणि नवी करवाढही रद्द केली. तसेच तुरुंगातील शेतकऱ्यांची सुटका करण्यात आली. वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील हा पहिला लढा यशस्वी झाला.
बार्डोली सत्याग्रह – सरदार वल्लभभाई पटेलांनी १९२८ ला गुजरात मध्ये इंग्रज सरकारने जमीन महसूल करांमधे अन्याय वाढीवरुद्ध शेतकऱ्यांनी केलेला सत्याग्रह होता त्यात विशेष करून सरकारची अट होती की,
एक तर संपूर्ण शेतसारा भरा
२ साराबंदीची चळवळ थांबवा तरच सरकार विचार करेल
यावर सरदारजींनी जाहीर केले:
१ सर्व सत्याग्रहींची मुक्तता
२ सर्व जप्त केलेल्या जमिनी परत करणे
३ जी गुरे व मालमत्ता कवडीमोल भावाने विकली त्याची योग्य किंमत मालकांना देणे.
४ ज्यांना नोकरी वरुन बडतर्फ केले असेल अशा सरकारी नोकरांना कामावर घेणे.
तदनंतर सरदारांनी लढा तीव्र केला नाव भारतभर दुमदुमू लागले. या नेतृत्वामुळे त्यांना “सरदार” पदवी मिळाली.
संस्थानांचे विलीनीकरण सरदार पटेलांचे महत्वाचे योगदान म्हणजे संस्थानांचे विलीनीकरण करणे. आमच्या शरीराचे तुकडे होतील पण देशाचे तुकडे होऊ देणार नाही म्हणून सरदारांनी सर्वात मोठं महत्वाच व राष्ट्रीय ऐक्याचे काम केलं ते म्हणजे सुमारे ५५२ संस्थानाचे विलीनीकरणाचे. १९४७ ला “स्टेट डिपार्टमेंट” जन्माला आले आणि सरदारांनी जवळ पास ४५० संस्थानांचे विलीनीकरण अवघ्या ३ आठवड्यात केले. परंतु जुनागड, हैदराबाद व काश्मीर ही संस्थाने भारतात विलीनिकरणास तयार नव्हती तो प्रश्न पटेलांनी कणखर भूमिका घेवून सोडवला.
जुनागडः जुनागड हे सौराष्ट्रातील संस्थान, तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते पण जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानमध्ये सामील होण्याच्या विचारात होता त्यावेळी प्रजेने विरोध केला, जास्त प्रजा हिंदूंचीच होती, तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला आणि जुनागड विलीन झाले.
हैदराबाद: सर्वात मोठे संस्थान (महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा प्रांत होती) निजामाची राजवट होती. निजामानेही सामील न होण्याच धोरण स्वीकारल, पोलीस कारवाई केल्यावर निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान विलीन केले.
काश्मीरः या संस्थानाचा राजा हरिसिंग होता. त्यांनी स्वतंत्र राहण्याचे ठरविले परंतु काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता. पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर टोळीच्या माध्यमातून स्वारी केली. त्यानंतर सरदारजींनी भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठविले. काही भाग भारतात विलीन केला. त्यानंतर नेहरूजींनी हा प्रश्न युनोकडे पाठविला तो आजही तसाच अधांतरीत आहे. म्हणूनच नेहमी म्हटल जाते, आधुनिक भारताचे दोन कर्णधार होते ते म्हणजे नेहरू व पटेल. नेहरूंनी राष्ट्राची उभारणी केली परंतु त्या राष्ट्राचा पाया भक्कम केला तो सरदार पटेलांनी हे अभिमानाने सांगावेसे वाटेल.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी सरदार पटेल ७३ वर्षाचे होते. खरं तर वय विश्रांतीच व आरामाच परंतु त्यांना आराम व विश्रांती हे शब्द माहीत नव्हते. या वयातही त्यांनी देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री पदाची धुरा सांभाळली. गांधीजींनंतर सरदार पटेल तीन वर्ष टिकले त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. अन्यायाची चीड, नेतृत्वगुण, स्वतःच्या ज्ञानाबद्दल प्रचंड विश्वास, कणखर बाणा, महासंयमी पुरुष अशा विविध गुणांनी संपन्न असणाऱ्या सरदार पटेलांनी अखेर १५ डिसेंबर १९५० ला सकाळी ०९:३३ मि. शेवटचा श्वास सोडला. रेडिओवर बातमी आली सर्वत्र दुःखाची छाया पसरली. नेहरूंनी थोडा वेळ पार्लमेंटमध्ये भाषण केल व बातमी कळवली. भाषणांत नेहरूजी म्हणालेत,
Sardar Patel was the Builder and Consolidator of New India. He was Tower of Strength.
माझ्याशिवाय कोणीही अंत्ययात्रेला येऊ नका असेही सांगितले. परंतु राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, काकासाहेब कालेलकर ही माणसे नुसती गेली नाहीत तर ढसाढसा रडलीत. १० लाख लोक सरदारजींच्या अंतयात्रेला सहभागी होती, एवढा प्रचंड जन समुदाय फक्त टिळकांच्या
अंतयात्रेलाच होता.
मित्रहो, त्यांच्या अंगी असलेली धडाडी, शेतकऱ्यांविषयीचे प्रेम, देशसेवेच व्रत व राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेले कार्य, तसेच हिंदुस्तानच्या मातीला जागलेला नेता या गुणांमुळे सरदार पटेलांचे नाव अजरामर आहे अशा या थोर महात्म्यास आणि त्यांनी केलेल्या कार्यास संपूर्ण देशात साजरं होणाऱ्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त शतशः प्रणाम.
प्रा. डॉ. सतीश आधार पाटील
सहयोगी प्राध्यापक
वनस्पतीशास्त्र विभाग
स.व.प. कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम