
इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे 19 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान राष्ट्रीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन
इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे 19 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान राष्ट्रीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन
मराठी नाटक ‘दगड आणि माती’ चे सादरीकरण
दिल्लीतील मराठी नाट्यप्रेमींना ‘दगड आणि माती’तून अनुभवता येणार अनोखा प्रवास
नवी दिल्ली, : दिल्लीतील मराठी नाट्यप्रेमींसाठी 26 सप्टेंबर हा दिवस अविस्मरणीय ठरणार आहे. कारण दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर (आयएचसी) येथे होणाऱ्या 21व्या राष्ट्रीय नाट्यमहोत्सवात नाशिकच्या सपान संस्थेचे प्रायोगिक मराठी नाटक ‘दगड आणि माती’ रंगभूमीवर सादर होणार आहे. दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित या नाटकाने प्रतिष्ठित व्यासपीठावर सलग चौथ्यांदा प्रवेश मिळवला आहे. यापूर्वी ‘हंडाभर चांदण्या’, ‘तो राजहंस एक’ आणि ‘कलगीतुरा’ या नाटकांची निवड झाली होती.
या महोत्सवात देशभरातील 14 उत्कृष्ट नाटकांचे सादरीकरण होणार असून ‘दगड आणि माती’ चे मंचन शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी द स्टेन ऑडिटोरियम येथे सायंकाळी 7 वाजता होईल. तब्बल 100 मिनिटांचे हे मराठी नाटक प्रेक्षकांसमोर सादर केले जाणार आहे. तिकीटांच्या किंमती 200,350 आणि 500 रुपये असून, ती bookmyshow.com तसेच हॅबिटॅट प्रोग्राम डेस्कवर उपलब्ध आहेत. उशीरा प्रवेशास कठोर मनाई असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या नाटकाचा शुभारंभ 2024 मध्ये मुंबईतील एनसीपीएच्या ‘प्रतिबिंब’ महोत्सवात झाला. त्यानंतर कोलकात्याच्या पश्चिम बंगाल शासन पुरस्कृत मिनर्व्हा 07व्या राष्ट्रीय नाट्यमहोत्सवात तसेच ‘नाट्य चौफुला’ सह अनेक महोत्सवांतही हे नाटक यशस्वी ठरले आहे. सध्या पुणे, नाशिक, मुंबईसह विविध शहरांत या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत.
या नाटकात उमेश जगताप, अनिता दाते केळकर, ओंकार गोवर्धन, आश्विनी कासार, बद्रीश कट्टी, जयश्री जगताप, प्रणव सपकाळे, कृतार्थ शेवगावकर, हेमंत महाजन, राजेंद्र उगले आणि मुकुल ढेकळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. निखिल मारणे (प्रकाशयोजना), लक्ष्मण कोकणे (नेपथ्य), ऋषिकेश शेलार (संगीत), ऋषिकेश गांगुर्डे (संगीत संयोजन) आणि कविता देसाई (वेशभूषा) यांनी नाटकाचे सौंदर्य वृद्धिंगत केले आहे. ही निर्मिती सपान (सचिन शिंदे अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, नाशिक) यांची आहे.
विसरलेल्या गावाची भावनिक कथा
‘दगड आणि माती’ हे नाटक बाभूळगाव या विसरल्या गेलेल्या खेड्याची कथा सांगते. येथे पाणी आणि रोजगाराचा तुटवडा असला तरी सोशल मीडियाचा प्रसार वेगाने होतो. शिक्षित पण बेरोजगार तरुण नाना याला गूगल मॅपवर गावाचे नाव नसल्याचे दिसते आणि याच क्षणी गावाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. मित्रांच्या मदतीने नाना गावाचा हरवलेला इतिहास आणि ओळख शोधण्याचा प्रयत्न करतो. ग्रामीण वास्तव, बेरोजगारी आणि सामाजिक उपेक्षा या मुद्द्यांवर भाष्य करणारे हे नाटक प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ इंडिया हॅबिटॅट सेंटर (आयएचसी) भारतीय नाट्यविरासत जपण्यासाठी आणि प्रोत्साहनासाठी काम करत आहे. यंदाच्या महोत्सवात महिरून,कादंबरी,केला-जामुनवाली, साँप-सीढ़ी, खिचिक,मेज़ोक, नाम में क्या रखा है, बेशर्म आदमी, 305 गली मंटोला, आंटी मोक्सी इज डेलूलू, गरम रोटी, नज़र के सामने, लिफाफिया यांसारखी इतर नाटकेही रंगभूमीवर सादर होणार आहेत. त्यामुळे दिल्लीतील नाट्यप्रेमींसाठी हा महोत्सव खास ठरणार असून त्यांना नक्कीच अनोखा अनुभव मिळणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम