
इंद्रधनुष्य युवक महोत्सवात संस्कृतीचा बहारदार रंगोत्सव; उद्या समारोप सोहळा
इंद्रधनुष्य युवक महोत्सवात संस्कृतीचा बहारदार रंगोत्सव; उद्या समारोप सोहळा
जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इंद्रधनुष्य युवक महोत्सवाच्या चौथ्या दिवशी विविध कला प्रकारातील भारतीय कला संस्कृतीचे विविध पैलू सादर करून विद्यार्थी कलावंतानी उपस्थितांची दाद मिळवली. दरम्यान उद्या दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता इंद्रधनुष्य युवक महोत्सवाचा समारोप होणार आहे. समारोपाला प्रसिध्द मराठी पार्श्वगायक आदर्श शिंदे यांच्या उपस्थितीचे आकर्षण ठरणार आहे.
इंद्रधनुष्य महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रंगमंच क्रमांक १ राष्ट्रकवी बंकिमचंद्र चटोपाध्याय सभागृहात भारतीय शास्त्रीय नृत्य या कलाप्रकारात शास्त्रीय नृत्याचे मनोहारी सादरीकरण रंगले. भरतनाट्य, कथ्थक आणि ओडीसी अशा विविध नृत्य प्रकारातील उमटलेली ताल, लय आणि भावनांच्या अभिव्यक्तीमुळे उपस्थित मंत्रमुग्ध्द झाले होते. यात एकूण १६ सघांनी सहभाग घेतला. तर दुपारच्या सत्रात भारतीय लोकसमुह नृत्याने सभागृहात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सभागृहातील उपस्थितांनी सादर झालेल्या लोकसमूह नृत्यावर अक्षरशा ठेका धरला. यात एकूण २२ सघांनी सहभाग घेतला.
रंगमंच क्र. २ स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात भारतीय शास्त्रीय गायन या कला प्रकारात कलावंतानी राग, रचना, भैरवी, एकताल, त्रीताल सादर करून सभागृहातील उपस्थितांची दाद मिळवली. यात एकूण १६ सघांनी सहभाग नोंदविला. दुपारच्या सत्रात भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (स्वर वाद्य) या कलाप्रकारात वाद्यांच्या सुरांनी सभागृहात सुरेल वातावरण निर्माण केले होते. यात एकूण २२ सघांनी सहभाग नोंदविला.
रंगमंच क्रमांक ३ भगवान बिरसा मुंडा सभागृहात प्रहसन आणि नक्कल या कला प्रकारांनी उपस्थितांना हास्याची मेजवानी दिली. विद्यार्थ्यांनी समाजातील वास्तव आणि विसंगतीवर हलक्या फुलक्या शैलीत भाष्य करत मनोरंजनासह सामाजिकतेचा संदेश दिला. प्रहसन या प्रकारात २० तर नक्कल या प्रकारात १७ सघांनी सहभाग नोंदविला.
रंगमंच क्रमांक ५ बाल हुतात्मा शिरीष कुमार सभागृहात झालेल्या स्थळचित्रण आणि इन्स्टालेशन या कलाप्रकारात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर कलात्मक अभिव्यक्ती साकारली. यात एकूण २१ सघांनी सहभाग नोंदविला.
रविवारी बक्षीस वितरण : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरु असलेल्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभदि. ९रोजी सकाळी ११ वाजता रंगमंच क्रमांक १ बंकिमचंद्र चटोपाध्याय सभागृहात होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी राहतील तर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रविंद्र कुळकर्णी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मिलींद बारहाते, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द मराठी पार्श्वगायक आदर्श शिंदे, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे उपस्थित राहणार आहेत. दि. ५ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या विविध कलाप्रकारातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनोद पाटील व विद्यापीठ विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम