इतर मागास, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’; अर्जासाठी १७ ऑगस्टपर्यंत मुदत

बातमी शेअर करा...

इतर मागास, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’; अर्जासाठी १७ ऑगस्टपर्यंत मुदत

जळगाव, शासनामार्फत इतर मागास प्रवर्ग (OBC), विमुक्त जाती भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट आर्थिक सहाय्य जमा करून त्यांना भोजन, निवास व शैक्षणिक साहित्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

या योजनेचा लाभ महापालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय/तालुकास्तरीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार असून त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. यामध्ये प्रत्येक वर्षासाठी १५० अशा एकूण ६०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतून भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील आणि पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे.

बी.ए., बी.कॉम., बी.एससी. यांसारख्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये आणि एम.ए., एम.एससी. यांसारख्या पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमांमध्ये इ. १२ वी नंतर प्रवेश घेतलेल्या अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर दिनांक १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करावेत. कोणतेही ऑफलाइन अर्ज कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत.

या योजनेअंतर्गत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज प्रक्रिया व वेळापत्रक यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभागाचे सहायक संचालक योगेश पाटील यांनी केले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक दिलासा मिळणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम