इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीच्या नावाने डॉक्टरला सतरा लाखांचा गंडा

बातमी शेअर करा...

इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीच्या नावाने डॉक्टरला सतरा लाखांचा गंडा

भुसावळ (प्रतिनिधी) – इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात मिळवण्याच्या आमिषाने एका डॉक्टरला तब्बल १७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी भुसावळमधील सिंधी कॉलनीतील निखिल सुनीलकुमार मनवानी (रा. भुसावळ) याला फरिदाबाद पोलिसांनी अटक केली आहे.

फरिदाबाद येथील डॉक्टर श्रीमंत गुईन यांना सोशल मीडियावर कमी किमतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीची जाहिरात दिसली होती. त्यांनी ६ सप्टेंबर २०२४ रोजी इन्स्टाग्रामवरून त्या खात्याच्या व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस पेजवर संपर्क साधला. त्यानंतर मनीष शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क केला. डॉक्टर गुईन यांनी वस्तू खरेदी करण्याची तयारी दाखवताच, त्यांना विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले.

डॉ. गुईन यांनी एकूण १७ लाख १० हजार १८० रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा केले. मात्र, वस्तू न मिळाल्याने त्यांनी तात्काळ फरिदाबाद सायबर क्राईम सेंट्रल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
फसवणुकीत श्रीनिवास राव (आयडीबीआय बँक) – १० लाख ९५ हजार १८० रुपये, तपश घोष (इंडसलँड बँक) – २ लाख ६८ हजार, दीपक (अ‍ॅक्सिस बँक) – २ लाख ९१ हजार आणि दशरथ (युपीआय) – ५६ हजार रुपये यांच्याकडे पैसे पाठवले गेले होते.

तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा माग काढला असता, भुसावळच्या सिंधी कॉलनीत राहणारा निखिल मनवानी हा मुख्य संशयित असल्याचे निष्पन्न झाले. फरिदाबाद क्राईम ब्रँचचे पथक भुसावळ येथे दाखल झाले आणि स्थानिक बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाच्या मदतीने संशयिताला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला फरिदाबादला नेले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम