
उच्च श्रेणीतील उपकरणांची माहिती अध्यापन आणि संशोधनासाठी उपयुक्त – कुलगुरू प्रा. माहेश्वरी
उच्च श्रेणीतील उपकरणांची माहिती अध्यापन आणि संशोधनासाठी उपयुक्त – कुलगुरू प्रा. माहेश्वरी
विद्यापीठात सहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप
जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य शिक्षक विकास अकादमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप विद्यापीठात उत्साहात झाला. या शिबिरामध्ये उच्च श्रेणीतील उपकरणांविषयी सखोल माहिती देण्यात आली असून या माध्यमातून भविष्यातील अध्यापन आणि संशोधन कार्यात निश्चितच मदत होईल असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले.
या वेळी मंचावर जैवशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. भूषण चौधरी, पर्यावरण भूशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. एस. एन. पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षक विकास अकादमीचे प्रतिनिधी वलांजू भार्गव आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू प्रा. माहेश्वरी पुढे म्हणाले की, विद्यापीठात अध्यापक हा सर्वात महत्त्वाचा घटक असून त्यांचे ज्ञान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी असे प्रशिक्षण शिबिर आवश्यक आहे. उपकरणांच्या वापराबाबतची माहिती संशोधन क्षेत्रात नवनवीन दृष्टीकोन निर्माण करण्यास मदत करेल. तसेच विद्यापीठाच्या ३५ वर्षांच्या वाटचालीत संशोधन आणि अध्यापन क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून तब्बल ४० प्राध्यापकांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी प्राध्यापकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रा. भूषण चौधरी यांनी सहा दिवसांच्या प्रशिक्षणाचा आढावा घेतला. तर प्रा. रक्षा कांकरिया यांनी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम