
उत्तम शिक्षण मिळावे यासाठी समाजाच्या सहभागाशिवाय पर्याय नाही – माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील
कायम विद्यापीठासोबत राहू ,स्नेह सोबती मेळाव्यात सूर
उत्तम शिक्षण मिळावे यासाठी समाजाच्या सहभागाशिवाय पर्याय नाही – माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील
कायम विद्यापीठासोबत राहू ,स्नेह सोबती मेळाव्यात सूर
जळगाव प्रतिनिधी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यापीठाच्या हाकेला प्रतिसाद देऊन कायम विद्यापीठा सोबत राहू अशा आशयाचा सूर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित स्नेहसोबती मेळाव्यात उमटला. उपस्थितांनी विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या प्रकारच्या पुढाकाराबद्दल आनंद व्यक्त केला.
विद्यापीठाला आजपर्यंत सुवर्णपदक, विविध व्याख्यानमाला, शिष्यवृत्ती अथवा इतर उपक्रमांना ज्या संस्था अथवा व्यक्ती यांनी देणगी दिली आहे त्यांच्या या सकारात्मक कृतीबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवार दि.२३ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ सोबती स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. सिनेट सभागृहात झालेल्या या मेळाव्यात उपस्थित सर्व प्रतिनिधींनी विद्यापीठाच्या या पहिल्या प्रयोगाचे मन:पूर्वक स्वागत करुन भविष्यात विद्यापीठाच्या विविध उपक्रमांसाठी सोबत राहण्याचे आश्वस्थ केले. या समारंभास विद्यापीठ सल्लागार परिषदेचे अध्यक्ष तथा जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी कुलगुरु डॉ. के.बी.पाटील, व्य.प.सदस्य राजेंद्र नन्नवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंचावर प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील उपस्थित होते.
प्रारंभी प्रा.एस.टी.इंगळे यांनी प्रास्ताविकात या स्नेहमेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांनी आपल्या भाषणात समाजाच्या सहभागाशिवाय भविष्यात शैक्षणिक संस्था टिकणार नाहीत कारण शिक्षणातून सरकार अंग काढून घेत आहे. भविष्यात हे प्रश्न गंभीर होऊ नयेय यासाठी आणि उत्तम शिक्षण मिळावे यासाठी समाजाच्या सहभागाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले.
अशोक जैन यांनी विद्यापीठाच्या स्थापनेपासून जैन समुह विद्यापीठासोबत असल्याचे सांगून सध्या या समुहाकडून ११ सुर्वणपदके दिली जातात. त्या पदकांसाठी प्रारंभीच्या काळात दिलेल्या रकमेत वाढ केली जाईल व भविष्यात अजून काही मदत करण्याचे आश्वासन दिले. राजेंद्र नन्नवरे यांनी समाजाने विद्यापीठाच्या पाठीशी एकदिलाने उभे राहण्याचे आवाहन केले. लवकरच फ्रेन्डस ऑफ युनिव्हर्सिटी ही कल्पना अंमलात आणली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी विद्यापीठ सोबती प्रतिनिधी या नात्याने प्राचार्य अनिल राव, जळगाव पिपल्स बँकेचे भालचंद्र पाटील, ॲङ रवींद्र पाटील, डॉ. प्रिती अग्रवाल, प्राचार्य एस. एन. पटेल, संदीप काबरा, एच.बी. करनकाळ यांनी मनोगत व्यक्त करतांना विद्यापीठाने प्रथमच या प्रकारचा स्नेहमेळावा घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करुन विद्यापीठाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व काही सूचना केल्या.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी सांगितले की, विद्यापीठाला स्थापनेपासून सातत्याने मिळालेले उत्तम नेतृत्व, समर्पित सहकारी आणि समाजाचा सहभाग यामुळे विद्यापीठाचा विकास होत गेला. भविष्यात राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाच सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील व वृषाली ललवाणी यांनी केले. सीए रवींद्र पाटील यांनी आभार मानले. विद्यापीठाने यापूर्वी सहा जणांना डी.लिट. पदवीने सन्मानित केले आहे. त्यांना त्यावेळी दिलेल्या मानपत्रांचे फ्रेमिंग विद्यापीठाच्या परीक्षा विभागात लावले जाणार आहे. त्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या ६० पेक्षा अधिक विद्यापीठ सोबतींना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यापीठाचा माहितीपट दाखविण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम