उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कबड्डी स्पर्धेत गौरव

बातमी शेअर करा...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कबड्डी स्पर्धेत गौरव

चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन कप स्पर्धेचा अमरावतीत शानदार समारोप

अमरावती | प्रतिनिधी – विदर्भ हौशी कबड्डी असोसिएशन, अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि शोध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर आयोजित केलेल्या चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा समारोप दि. 4 मे 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

या राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमध्ये देशभरातील 9 राज्यांतील नामवंत पुरुष व महिला कबड्डी संघांनी सहभाग घेतला. तीन दिवस चाललेल्या या उत्सवमयी वातावरणात अमरावती शहर कबड्डीचा केंद्रबिंदू ठरले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी उपस्थित राहिलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचा बुलढाणा जिल्हा हौशी कबड्डी असो. व जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि गदाधारी हनुमंताची चांदीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
उपमुख्यमंत्र्यांकडून क्रीडा क्षेत्रासाठी भरीव आश्वासन

गाडगेबाबा मंदिरासमोरील प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती ही सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात पुढारलेले शहर असल्याचा अभिमान व्यक्त केला. राज्य सरकार क्रीडा क्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

त्यांनी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांना मोठ्या भावाच्या नात्याने अमरावतीच्या विकासासाठी विशेष निधी देण्याचे आश्वासन दिले.
उत्कृष्ट संयोजनाचे सर्वत्र कौतुक

या भव्य क्रीडा महोत्सवात व्यासपीठावर आ. सुलभाताई खोडके, आ. संजय खोडके, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, आशिया कबड्डी संघाचे अध्यक्ष तेजस्वी गेहलोत, तसेच अनुप कुमार, राकेश कुमार, यश खोडके, बाबुराव चांदेरे, बलवान सिंह, विभोर विनीत जैन, चेतन जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोध प्रतिष्ठानचे यश खोडके आणि विदर्भ हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्रसिंह ठाकुर यांचे कौतुक करत स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले.
अजिंक्यपदासाठी रंगले चुरशीचे सामने

पुरुष गटात इंडियन रेल्वे संघाने राजस्थान संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

महिला गटात, हिमाचल संघाने इंडियन रेल्वे संघावर मात करत अजिंक्य ठरले.

या रंगतदार लढती पाहण्यासाठी गाडगेबाबा मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती होती. खेळाडूंना देण्यात आलेल्या उत्कृष्ट सुविधा आणि आयोजनाच्या नियोजनशिलतेचे सर्वत्र कौतुक झाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम