
एआयचा धोकादायक वापर
चॅटजीपीटीद्वारे बनावट आधारपॅन कार्डसह अन्य पुरावे तयार
मुंबई (प्रतिनिधी) गेल्या काही आठवड्यांपासून तुफान लोकप्रिय ठरलेले एआय टूल ‘चॅटजीपीटी’ (ChatGPT) आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. युजर्सना हवे तसे फोटो तयार करून देणाऱ्या ‘चॅटशॉट’ (ChatShot) या फिचरद्वारे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार केल्याचे प्रकार समोर आले असून, सोशल मीडियावर हे गंभीर प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे.
नुकतेच लॉन्च झालेले GPT-4o हे चॅटजीपीटीचे नविन व अधिक प्रगत मॉडेल असून, हे मॉडेल युजरच्या सूचनांनुसार अचूक, फोटो-रिअलिस्टिक प्रतिमा तयार करू शकते. या क्षमतेचा गैरवापर करत काही युजर्सने बनावट ओळखपत्रे तयार केली असून, ती इतकी अस्सल वाटतात की सामान्य व्यक्ती सहज फसवला जाऊ शकतो.
‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरील यशवंत या युजरने अशाच बनावट आधार व पॅन कार्डांची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. त्या कार्डांमध्ये डिझाईन, बारकोड, आणि क्रमांक इतक्या बारकाईने बसवले गेले आहेत की फक्त चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांवरूनच ते नकली असल्याचे कळते.
या प्रकारामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर, ओळख चोरी, आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हेगारीसाठी नविन वाटा खुल्या झाल्याची चिंता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ओपनएआय या संस्थेनेही GPT-4o हे मॉडेल अत्यंत शक्तिशाली असल्याचे मान्य केले असून, त्याच्या वापराबाबत अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.
GPT-4o च्या माध्यमातून आतापर्यंत 7000 दशलक्षांहून अधिक प्रतिमा तयार झाल्या आहेत. बहुतांश प्रतिमा कलात्मक असल्या तरी त्यातून होत असलेला गैरवापर ही गंभीर बाब बनली आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की, अशा प्रकारच्या एआय क्षमतांचा वापर सकारात्मक कार्यासाठी होणे आवश्यक आहे. मात्र, त्याचवेळी याचा गैरवापर रोखण्यासाठी तांत्रिक तसेच कायदेशीर उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. अन्यथा, तंत्रज्ञानाचा उपयोग प्रगतीसाठी न होता, गुन्हेगारीसाठी होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम