
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक
जळगाव, : जिल्ह्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाबाबत पुढील दिशानिर्देश निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय बैठक नुकतिच संपन्न झाली.
या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील एकल महिला ,विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, ४० वर्षांवरील अविवाहित, दिव्यांग तसेच निराधार अवस्थेत एकट्या राहणाऱ्या महिलांचे सर्वेक्षण करताना अवलंबावयाची एकसंध व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वेक्षणातून पात्र महिलांची अचूक माहिती संकलित करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना ठरविण्यात आल्या.
तसेच विविध विभागांमधील समन्वय अधिक सक्षम करून सर्वेक्षण प्रक्रिया पारदर्शक, वेळबद्ध व परिणामकारक करण्याबाबत स्पष्ट दिशानिर्देश देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी अचूक सर्वेक्षण, प्रभावी विभागीय समन्वय आणि संवेदनशील प्रशासनिक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे.”
या बैठकीद्वारे एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी संरचित सर्वेक्षण, योजनांचा प्रभावी लाभ व प्रशासनिक समन्वय या दिशेने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी , नगर विकास शाखा सहायक आयुक्त तसेच तहसिलदार (संगायो), आदी अधिकारी उपस्थित होते

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम