
एका दिवसाचे बाळ घरी; अन् आई गेली देवाघरी..!
आई केव्हा परत येईल याची त्या बालकाला प्रतीक्षा तर नसेल ना ?
दै. बातमीदार । १६ ऑक्टोबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील विखरण रोडलगत ची माहेर वाशिण आशाबाई उर्फ स्वाती ऋषिकेश मराठे वय-२१ वर्षे या विवाहितेची शहरातील आई हॉस्पीटल या रुग्णालयात शुक्रवारी दुपारी प्रसुती झाली.
तिने बाळाला जन्म दिला. ती मातृत्वाच्या आनंदात असताना अवघ्या २४ तासांतच तिची प्रकृती कमालिची खालावल्याने तिला ऑक्सिजन लावून जळगावला पुढील उपचारासाठी नेत असताना वाटेवरच अकस्मात मृत्यूने तिला अलिंगन दिले.
नवजात अर्भक घरी असून आईची वाट पाहत आहे जणू आपली आई केव्हा परत येईल याची त्या बालकाला प्रतीक्षा तर नसेल ना ? अवघ्या एका दिवसाच्या बालकाला जन्म मृत्यूचा खेळ कसा समजणार..?
एकीकडे बाळाच्या जन्माचा कुटुंबाला झालेला आनंद तर त्याचवेळी स्वातीचे झालेले आकस्मिक निधन अशी दुर्दैवी स्थिती निर्माण झाल्यामुळे मराठे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्वाती मराठे हीचे माहेर व सासर एरंडोल येथीलच आहे. तिला दिवस गेल्यापासून घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. आपल्या वंशाला दिवा मिळेल असे स्वप्न तिच्या पती सह सासू-सासरे हे पाहत होते.
त्यांचे स्वप्न खरेही ठरले. परंतू नियतीने वेगळा डाव खेळला. बाळाचे दर्शन घेऊन आईचा आनंद गगनात मावत नव्हता.
कुटुंबात देखील आनंदी वातावरण निर्माण झाले, मात्र शनिवारी दुपारी तिची प्रकृती अचानक बिघडली.
बाळाला जन्म दिल्याचा आनंद अवघ्या २० ते २२ तासांपर्यंतच तिला लाभला तिला ऑक्सिजन लावून जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले असता वाटेतच मृत्यूला तिने कवटाळले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम