‘एक परिवार, एक दाखला’ उपक्रम राबवावा

सावखेडा परिसरातील नागरिकांची मागणी

बातमी शेअर करा...

‘एक परिवार, एक दाखला’ उपक्रम राबवावा

सावखेडा परिसरातील नागरिकांची मागणी

सावदा प्रतिनिधि

शालेय विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी पालकांना होणारी धावपळ आणि आर्थिक खर्च कमी करण्यासाठी शासनाने ‘एक परिवार, एक दाखला’ उपक्रम राबवावा, अशी मागणी सावखेडा परिसरातील नागरिकांनी केली आहे.

प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर व सेंट्रलचा जातीचा दाखला यांसारख्या कागदपत्रांसाठी पालकांना वारंवार शासकीय कार्यालयात जावे लागते. एका कुटुंबात एकापेक्षा अधिक मुले असल्यास प्रत्येकासाठी स्वतंत्र दाखल्यांची गरज भासते, ज्यामुळे वेळ, पैसा आणि श्रमाचा अपव्यय होतो.

सुविधा राबवण्याची गरज:
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एका कुटुंबासाठी एकच शैक्षणिक दाखला उपलब्ध करून त्यावर सर्व मुलांची नावे समाविष्ट करावी. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांवरील ताण कमी होईल आणि पालकांची धावपळही वाचेल. ही सुविधा जर सर्व शासकीय कार्यालयांत सुरू केली तर याचा व्यापक फायदा होईल.

शासकीय यंत्रणेवर ताण:
लोकसंख्या वाढत असल्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी संख्या कमी पडते. यामुळे कधी कधी वेळेत दाखले मिळत नाहीत आणि विद्यार्थी व पालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक आदेश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एन. के. महाजन, सावखेडा बुद्रुक, तालुका रावेर:
“हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ‘एक परिवार, एक दाखला’ ही योजना लागू झाल्यास पालकांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचेल. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ आणि ‘एक परिवार, एक राशन कार्ड’ यांसारख्या योजनेच्या धर्तीवर ही योजना प्रभावी ठरू शकते.”

गोपाळ पाटील, समाजसेवक, सावखेडा बुद्रुक, तालुका रावेर:
“चालू शैक्षणिक वर्षापासूनच या योजनेची अंमलबजावणी व्हायला हवी. एकापेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या कुटुंबांना वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागते. यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. ही योजना लागू झाल्यास सरकारी अधिकाऱ्यांवरील ताणही कमी होईल आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी कागदपत्रे वेळेत मिळू शकतील. सर्वच क्षेत्रांतून या योजनेचे स्वागत होईल.”

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम