
एमआयडीसीतील मेरीको कंपनीवर आयकर विभागाची धाड; उद्योजकांमध्ये खळबळ
एमआयडीसीतील मेरीको कंपनीवर आयकर विभागाची धाड; उद्योजकांमध्ये खळबळ
जळगाव: शहरातील एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील मेरीको कंपनीवर आयकर विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या या तपासणीला गुरुवारीही पुढे चालू ठेवण्यात आले. मुंबईहून आलेले आयकर विभागाचे पथक कंपनीच्या आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांची कसून तपासणी करत आहे. या कारवाईने जळगावच्या औद्योगिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आयकर पथक कंपनीच्या कार्यालयात तळ ठोकून विविध रेकॉर्ड्स आणि नोंदींची बारकाईने पडताळणी करत आहे. या कारवाईत पूर्णपणे गोपनीयता पाळली जात असून, आयकर अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरले आहेत, त्यामुळे तपासणीमागील नेमके कारण अस्पष्ट आहे.
प्रामुख्याने कंपनीच्या आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि लेखा नोंदींची छाननी केली जात आहे. या तपासणीचा निकाल काय लागणार आणि त्यातून काय समोर येणार, याकडे संपूर्ण उद्योजक वर्गाचे लक्ष लागले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम