
एमआयडीसी पोलिसांच्या धडक कारवाईत मोबाईल चोरीचा पर्दाफाश
एमआयडीसी पोलिसांच्या धडक कारवाईत मोबाईल चोरीचा पर्दाफाश
चोरीचा संपूर्ण मुद्देमाल व चारचाकी वाहन जप्त
जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश करत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन जप्त केले आहे. घटना दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अजिंठा चौकाजवळ घडली. फिर्यादी बसची वाट पाहत असताना चारचाकी वाहनातील अज्ञात आरोपींनी त्यांना धुळे येथे जायचे आहे का, असे विचारले. विश्वास संपादन करून आरोपींनी प्रवासाच्या बहाण्याखाली फिर्यादींच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम २२,५०० रुपये चोरी केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला घटनास्थळी रवाना केले. पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकों गणेश शिरसाळे, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, प्रदीप चौधरी, नरेंद्र मोरे यांनी सिसिटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेतला.
तपासात वसिम अजमल खान (३५, रा. नशिराबाद, ता. जळगाव) आणि जाफर उल्ला कहुल्ला कासार (४२, रा. साथी बाजार, नशिराबाद) यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी कबुली दिली की, चोरी इतर दोन साथीदारांसह केली. पोलिसांनी चोरीचा मोबाईल, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले सुमारे ५,००,००० रुपये किमतीचे मारुती अर्टीगा चारचाकी वाहन जप्त केले.
न्यायालयासमोर हजर केल्यावर आरोपींना दोन दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली. पुढील तपास पोना प्रदीप चौधरी करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम