
एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा अपघात संशयास्पद; पत्नीने घातपाताचा संशय
एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा अपघात संशयास्पद; पत्नीने घातपाताचा संशय
एरंडोल : प्रतिनिधी
एरंडोल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे सक्रिय कार्यकर्ते दशरथ बुधा महाजन यांच्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असून, ही घटना नेमकी अपघात होती की घातपात, याबाबत संशय व्यक्त होत आहे. त्यांच्या पत्नी कल्पना महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना १२ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. महाजन हे ज्ञानेश्वर नामदेव महाजन (रा. भालगाव) यांच्यासोबत पोल्ट्री फार्मसाठी मुरूम पाहण्यासाठी दुचाकी (क्र. एमएच १९ ईएच ९१५१) घेऊन भालगाव–बोरगाव रस्त्याने जात असताना, एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात ते रस्त्यावर दूर फेकले गेले व गंभीररीत्या जखमी झाले.
प्राथमिक उपचार एरंडोलमधील खासगी रुग्णालयात करून, गंभीर स्थितीमुळे त्यांना जळगाव येथील न्युक्लिअस हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डाव्या डोळ्याचे दृष्टी नुकसान झाले असून दोन्ही बाजूच्या सात बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. फुफ्फुस आणि यकृत यांना गंभीर इजा पोहोचली आहे. मेंदू आणि डोक्याला देखील गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून, दोन्ही पाय तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीत गंभीर स्थिती कायम आहे.
या घटनेप्रकरणी महाजन यांच्या पत्नी कल्पना महाजन यांनी दिलेल्या तक्रारीत हा केवळ अपघात नसून नियोजित घातपात असावा, असा ठाम संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या फिर्यादीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर व अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी एरंडोल पोलीस ठाण्यास भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथकही चौकशीत गुंतले असून, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहीदास गबाले तपासाचे नेतृत्व करीत आहेत.
दरम्यान, दशरथ महाजन यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी समर्थकांनी प्रार्थना सुरू केली आहे. घटनास्थळ व अपघाताच्या स्वरूपावरून हा नियोजित कट असावा का, याबाबत पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम