
एरंडोल-कासोदा मार्गावर एस.टी. बस नाल्यात पलटी; एक ठार, ५० पेक्षा अधिक जखमी
एरंडोल-कासोदा मार्गावर एस.टी. बस नाल्यात पलटी; एक ठार, ५० पेक्षा अधिक जखमी
एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल-कासोदा मार्गावर शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी एक भीषण अपघात घडला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) एरंडोल-भडगाव मार्गावरील (MH 20 BL 3402) बस अचानक नाल्यात उलटली. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून ५० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
घटनेनंतर काही क्षणातच मदतकार्य सुरू करण्यात आले. प्रशासनाच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. क्रेनच्या सहाय्याने बस नाल्यातून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस, रुग्णवाहिका आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी तत्काळ दाखल झाले.
या अपघातात एक प्रवासी ठार झाला असून, १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. तसेच ३५ किरकोळ जखमींवर एरंडोल येथेच प्राथमिक उपचार सुरू आहेत. सर्व जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभागाने समन्वयाने काम सुरू केले आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ एरंडोल-कासोदा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम