एरंडोल पोलीस ठाण्याच्या हवालदाराला ३ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

बातमी शेअर करा...

एरंडोल पोलीस ठाण्याच्या हवालदाराला ३ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; परिसरात खळबळ

एरंडोल | प्रतिनिधी

एरंडोल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार बापू लोटन पाटील यांना ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. बुधवारी झालेल्या या कारवाईने पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात एक दुचाकी जप्त करण्यात आली होती. ही दुचाकी परत देण्यासाठी नुकतेच जळगावहून एरंडोल येथे बदली होऊन आलेले हवालदार बापू लोटन पाटील यांनी म्हसवे (ता. पारोळा) येथील तक्रारदाराकडून पैशांची मागणी केली होती. तक्रारदार स्वतः या अपघातात जखमी झाला असूनही त्याच्याकडून अवास्तव रक्कम मागितल्याचे समोर आले आहे.

तडजोडीनंतर ३ हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटविण्याचे ठरले, आणि तक्रारदाराने बापू पाटील यांना एरंडोल हायवे चौफुली येथे पैसे घेण्यासाठी बोलावले. ठरलेल्या ठिकाणी आलेल्या पाटील यांनी तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताच, धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

जप्त दुचाकी परत देण्याबाबत विनंती करूनही पाटील यांनी लाच घेतल्याशिवाय वाहन परत देण्यास नकार दर्शविला होता, अशी माहिती तक्रारदाराने दिली आहे.

कारवाईनंतर हवालदार बापू पाटील यांना पुढील चौकशीसाठी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत एरंडोल पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम