
एलपीजी रिफिलिंग प्लांटमध्ये माथाडी कामगारांना प्रवेश नाकारला
एलपीजी रिफिलिंग प्लांटमध्ये माथाडी कामगारांना प्रवेश नाकारला
जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीची कार्यवाही
जळगाव प्रतिनिधी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., एम.आय.डी.सी. येथील एलपीजी रिफिलिंग प्लांटमध्ये नोंदणीकृत माथाडी कामगारांना प्रवेश व काम नाकारल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. उत्तर महाराष्ट्र माथाडी व इतर श्रमिक संघटनेने ३ डिसेंबरपासून कामगारांना प्लांटमध्ये प्रवेश रोखल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
बैठकीदरम्यान परिस्थितीची सविस्तर माहिती घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांना स्पष्ट निर्देश दिले की, मतदानासाठी सुट्टी घेतल्याच्या कारणावरून कोणत्याही नोंदणीकृत माथाडी कामगाराला कामावरून दूर ठेवणे अयोग्य असून सर्व कामगारांना उद्यापासून सकाळच्या शिफ्टमध्ये तात्काळ रुजू करून घ्यावे. कामगारांचे कायदेशीर हक्क अबाधित राहतील तसेच उद्योग क्षेत्रातील नियमित कामकाज सुरळीत राहावे यासाठी आवश्यक समन्वयाने काम करण्याचा आदेशही त्यांनी दिला.
या बैठकीस पोलीस विभाग, कामगार विभाग, बीपीसीएल–एचपीसीएलचे व्यवस्थापक, संबंधित ट्रान्सपोर्टर, माथाडी संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम