एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बातमी शेअर करा...

एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जळगाव : प्रतिनिधी हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात आरक्षण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी सकल बंजारा समाज आरक्षण कृती समितीतर्फे मंगळवारी दुपारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाची सुरुवात शिवतीर्थ मैदानावरून झाली. “सेवालाल महाराज की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मोर्चेकऱ्यांच्या हातात सेवालाल महाराज व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमा दिसून येत होत्या. शिवतीर्थ मैदानापासून स्टेडियम चौक, स्वातंत्र चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत बंजारा समाजातील नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत, समाजाला एस.टी. प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली. समाजाच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी निवेदन देण्यात आले.

मोर्चात बंजारा बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला होता. डफ व पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य सादर करत त्यांनी आंदोलनाला उत्सवी रंग दिला. महिलांचा मोठा सहभाग यावेळी पाहायला मिळाला. तसेच ‘बंजारा गोरा कमांडो’ या स्वयंसेवक गटाने शिस्तबद्ध व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.

मोर्चामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने नियंत्रण मिळवत मोर्चा शांततेत पार पाडला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम