एसबीआय शाखेत व्यापाऱ्याच्या भरण्यात बनावट नोटा आढळल्याने खळबळ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

एसबीआय शाखेत व्यापाऱ्याच्या भरण्यात बनावट नोटा आढळल्याने खळबळ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : शहरातील बोदवड रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत व्यापाऱ्याच्या भरण्यात पाचशे रुपयांच्या काही बनावट नोटा आढळल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी बँक व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास वीटभट्टी व्यवसाय करणारे एक व्यापारी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत १ लाख २० हजार रुपयांची रोकड भरण्यासाठी आले होते. मात्र, मशीनद्वारे तपासणी दरम्यान पाचशे रुपयांच्या सात नोटा (एकूण ३५०० रुपये) बनावट असल्याचे निदर्शनास आले.

ही बाब रोखपालाने तत्काळ शाखा व्यवस्थापक कार्तिक दहीकर यांना कळवली. चौकशीदरम्यान व्यापाऱ्याने सदर नोटा दुसऱ्याकडून मिळाल्याचे सांगितले. घटनेची माहिती व्यवस्थापकांनी पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना दिल्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करत अज्ञात व्यक्तीविरोधात बनावट नोटा वापरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला.

यानंतर पोलिस व फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आणि दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत बँकेत पाहणी करण्यात आली. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे हे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम