एस.डी. सीडतर्फे शालेय विद्यार्थ्यांना ए.आय. तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

बातमी शेअर करा...

एस.डी. सीडतर्फे शालेय विद्यार्थ्यांना ए.आय. तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

सेंट टेरेसा शाळेत नववीच्या २२५ विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय ए.आय. शिबिर; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव : भविष्यातील तंत्रज्ञानाशी शालेय विद्यार्थ्यांची ओळख व्हावी व त्यांना आधुनिक ज्ञानासाठी सज्ज करता यावे, या उद्देशाने सुरेशदादा जैन शैक्षणिक व औद्योगिक विकास योजना (एस.डी. सीड) यांच्या वतीने गुरुवार दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी सेंट टेरेसा शाळेतील इयत्ता नववीच्या सुमारे २२५ विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या विषयावर आधारित एकदिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या मार्गदर्शन शिबिरात आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. संजीव चौधरी यांनी विद्यार्थ्यांना ए.आय. तंत्रज्ञानाची प्राथमिक ओळख करून देत, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, ती कशी कार्य करते, याची सोप्या व समजण्याजोग्या भाषेत माहिती दिली. तसेच ChatGPT सारखी ए.आय. साधने अभ्यास, माहिती संकलन व विचारशक्तीच्या विकासासाठी कशी उपयुक्त ठरू शकतात, याबाबत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.

यावेळी प्रियांका चौधरी मॅडम यांनी ए.आय.चे दैनंदिन जीवनातील तसेच शिक्षण क्षेत्रातील महत्त्व विशद करत, ChatGPT, Google Gemini यांसारख्या आधुनिक ए.आय. साधनांचा अभ्यास नियोजन, नोट्स तयार करणे, संकल्पना समजून घेणे व आत्मविश्वास वाढवण्यासाठी कसा प्रभावी वापर करता येईल, हे उदाहरणांसह स्पष्ट केले. यासोबतच सायबर सुरक्षिततेचे महत्त्व, ए.आय.चा योग्य व जबाबदार वापर याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ व्याख्यानांपुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ए.आय. टूल्स कसे वापरायचे याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या शंका विचारून त्यांचे निरसन करून घेतले.

या कार्यक्रमास एस.डी. सीडचे गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सेंट टेरेसा शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जुलीट, उपमुख्याध्यापिका सिस्टर डेला, तसेच एम. जे. कॉलेजचे माजी प्राध्यापक व एस.डी. सीडचे प्रमुख मार्गदर्शक सोमवंशी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

हे मार्गदर्शन शिबिर यशस्वी होण्यासाठी एस.डी. सीडचे सर्व प्रतिनिधी व सेंट टेरेसा शाळेच्या शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना भविष्यातील ए.आय. आधारित जगासाठी तयार करण्याच्या दृष्टीने हे शिबिर निश्चितच उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम