ऑपरेशन ‘नार्कोस’अंतर्गत मोठी कारवाई : जळगाव रेल्वे स्थानकावर ८.२ किलो गांजासह दोघांना अटक

बातमी शेअर करा...

जळगाव (प्रतिनिधी) : रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत जळगाव रेल्वे स्थानकावर गांजाची मोठी तस्करी उघडकीस आणली आहे. या कारवाईत १ लाख २३ हजार रुपये किमतीचा सुमारे ८ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे. दोघांनाही पुढील कारवाईसाठी भुसावळ आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले आहे.


बुधवारी दुपारी जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने एका संशयास्पद व्यक्तीला थांबवले. विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याच्याजवळील काळ्या बॅगेतून गांजासारखा उग्र वास येत असल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यामध्ये गांजा आढळून आला.


अटक करण्यात आलेल्या संशयिताने आपले नाव झबी उल्ला समी उल्ला (वय २७, रा. टँक मोहल्ला, मोदी रोड, बेंगळुरू, कर्नाटक) असल्याचे सांगितले. तो कर्नाटक एक्सप्रेसने गांजा बेंगळुरूला घेऊन जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पकडले.

दरम्यान, गांजाच्या वाहतुकीत भीमसिंह मालसिंग बारेला (वय ४२, रा. कुंड्या पाणी, ता. चोपडा, जि. जळगाव) याचा सहभागही निष्पन्न झाल्याने त्यालाही रात्री उशिरा अटक करण्यात आली.


तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. सहायक सुरक्षा आयुक्त, भुसावळ यांनी स्वतः घटनास्थळी हजेरी लावली. स्टेशन प्रमुख विलास फाळक यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रिक काट्याच्या साहाय्याने गांजाचे वजन घेण्यात आले.

अटकेतील दोन्ही आरोपी आणि जप्त गांजासह सर्व पुरावे भुसावळ आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम