ऑर्किड नेचर फाऊंडेशन दोन दिवसीय पर्यावरण-अभ्यास सहल

१६ सदस्य ह्या अभ्यास प्रकल्पात सहभागी

बातमी शेअर करा...

ऑर्किड नेचर फाऊंडेशन दोन दिवसीय पर्यावरण-अभ्यास सहल

१६ सदस्य ह्या अभ्यास प्रकल्पात सहभागी

जळगाव प्रतिनिधी

ऑर्किड नेचर फाऊंडेशन, जळगावची दोन दिवसीय “पर्यावरण-अभ्यास” सहल दि. १ व २ फेब्रुवारी २०२५ (शनिवार व रविवार) रोजी यशस्वीपणे संपन्न झाली. ऑर्किड नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी यांच्यासह १६ सदस्य ह्या अभ्यास प्रकल्पात सहभागी झाले होते. दि. १ फेब्रुवारी २०२५ शनिवार रोजी सकाळी अमळनेर येथील पर्यावरण प्रेमींनी स्थापन केलेल्या अंबरीष ऋषी टेकडी ग्रुपला अंबरीष ऋषी टेकडी येथे भेटण्यासाठी गेलो. तिथे टेकडी ग्रुपचे समन्वयक आशिष चौधरी यांनी सर्व सदस्यांशी ओळख करून दिली.

 

. गेल्या १० वर्षांपासून टेकडी ग्रुपचे सदस्य डॉ. अनिल वाणी, तुळशीराम भदाणे, श्री. नरेश कांबळे, हेमंत पाठक, डॉ. राजेंद्र सोनार, डॉ. बी. एस. पवार, आशिष चौधरी, किशोर पाटील, संजय पाटील, दिपक मोरे,बाविस्कर या सर्वांनी श्रमदानातून टेकडीवर केलेल्या वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन कामाची पाहणी केली. अध्यक्ष श्री. तुळशीराम भदाणे यांनी माहिती दिली. जलशुद्धीकरण केंद्रातील दररोज वाया जाणाऱ्या सहा लाख लीटर पाण्याचा उपयोग करून उजाड टेकडीवर नंदनवन फुलवले आहे. त्यासाठी श्रमदानातून चार मोठ-मोठ्या टाक्या बांधल्या आहेत. त्यांच्या ह्या कार्याचा गौरव करण्यासाठी र्ऑर्किड नेचर फाऊंडेशन तर्फे अंबरीष ऋषी टेकडी ग्रुपला “पर्यावरण मित्र पुरस्कार २०२५” देऊन सन्मानित केले. टेकडी ग्रुपचे सदस्य श्री. आशिष चौधरी आणि डॉ. राजेंद्र सोनार यांचे सहकार्य मिळाले.
अमळनेरहून सकाळी १०:३० वाजता बारीपाडा जाण्यासाठी निघालो. तिथे दुपारी २:०० वाजता पोचलो. बारीपाडा येथील महिला बचत गटाच्या महिलांनी पूर्वनियोजनानुसार आमच्यासाठी स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली होती. साधे पण स्वादिष्ट, सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन आम्ही तृप्त झालो. दुपारी बारीपाडयात फिरताना ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडले. प्रत्येक लाकडी दरवाज्यावर भारतीय संस्कृतीत पूज्य प्राणी पक्षी आणि चिन्हांची चित्रे पारंपरिक पद्धतीने रेखाटली होती. उतरत्या छपरांची कौलारू घरे, स्वच्छ रस्ते, प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या सर्व गोष्टी विकासाची आणि प्रगतीची साक्ष देत होत्या. बहुतेक गावकरी मंडळी शेतात गेलेली, दोन-चार महिला घरी दिसल्या, त्याही काहीतरी काम करत होत्या. पाड्याच्या अवतीभवती हिरवीगार शेते वाऱ्यावर डोलत होती. जिथे एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते त्याच बारीपाड्याचे गावकरी आता दुबार पिकं घेतात. इथे पिकवल्या जाणाऱ्या सुगंधी इंद्रायणी तांदूळास विशेष मागणी वाढत आहे. तसेच दुसरे पिक म्हणजे कांदा आणि गहू सर्वत्र दिसून आला.

बारीपाड्याचे सरपंच आणि परिवर्तनकार चैत्राम पवार यांना पद्मश्री जाहीर झाल्यापासून पंचक्रोशीतीलच नव्हे तर अनेक राज्यातील आणि जिल्ह्यातील मंडळी त्यांना भेटण्यासाठी आणि सत्कार करण्यासाठी येत आहेत. शनिवारी जवळपास पाच ते सहा ग्रुप भेटून गेले. आमची भेट संध्याकाळी ६ ते ७:३० या दरम्यान झाली. त्यावेळी सर्वांचा परिचय करताना स्वतः चैत्राम दादा यांनी स्वतःपासून सुरुवात केली. त्यानंतर मनमोकळा संवाद साधत आम्हाला त्यांच्या बारीपाडा पर्यावरण अभ्यास केंद्राबद्दल सविस्तर माहिती दिली. बोलणं अगदी शांत, हळुवार ऐकत रहावसं वाटत होतं. समाजाचा शाश्वत विकास याविषयी ते भरभरून बोलले. गावातून शहराकडे होणारे स्थलांतर कसे थांबवले, कोणकोणत्या बिंदूवर काम केले हे सांगताना त्यांना जराही थकवा येत नाही. जल, जमीन, जंगल, जन आणि जनावर या पाच गोष्टींसाठी त्यांनी गेले ३०-३२ वर्षे अथक परिश्रम घेतले आहेत. कमीत कमी गरजांमध्ये आनंदी जीवन जगण्याचे रहस्य बारीपाडा ग्रामस्थांना चैत्राम पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे अत्यल्प खर्चात गावातील लोक सुखी समाधानी समृद्ध जीवनाचा आनंद घेताना दिसतात. ऑर्किड नेचर फाऊंडेशन तर्फे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांच्या उपस्थितीत त्यांना ‘पर्यावरण मित्र पुरस्कार २०२५’ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर आमच्याबरोबर त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

रात्री शेकोटी भोवती गप्पा रंगल्या. त्यात बारीपाडा पॅटर्न हा मुख्य विषय होता. दुसऱ्या दिवशी रविवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी बारीपाडा ग्रामस्थांनी संरक्षित आणि संवर्धित केलेल्या जंगलात भटकंतीसाठी निघालो. आमच्या सोबत श्री. कैलास पवार हे गाईड म्हणून आले होते त्यांनी अनेक वृक्षांची ओळख करून दिली. या जंगलात एकूण ४३५ प्रकारची वृक्षसंपदा आहे. ठिकठिकाणी श्रमदानातून बांधलेले एकूण ४५० बंधारे आहेत. पक्षांचा किलबिलाट, प्राण्यांचा मुक्त संचार आहे. एकूण ११०० हेक्टर वनक्षेत्र असणारी भारतातील एकमेव ग्रामपंचायत आहे. सकाळी ११:०० पर्यंत जंगलातून परतलो. येताना बारीपाड्यातील पिकवलेला सुगंधी इंद्रायणी तांदूळ सर्वांनी आवर्जून विकत घेतला. आम्ही दुपारी ३:३० वाजता परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत अक्कल पाडा प्रकल्पास भेट दिली. सूर्यास्ताची वेळ होती. लालसर किरणे अथांग जलाशयावर पसरली आणि बघता बघता लाल गोळा नजरेत आड गेला. एक निवांत रम्य संध्याकाळ अनुभवली. दोन दिवसांच्या या अभ्यास सहलीत सर्वांच्या मनातील विचार, कल्पना, उपक्रम यांची देवाणघेवाण होऊन त्यावर यथेच्छ चर्चा झाली. प्रत्येक क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले गेले. जाताना मनात जो उद्देश आणि अपेक्षा घेऊन आम्ही निघालो होतो त्यापेक्षा कितीतरी जास्त ज्ञान चैत्राम पवार यांच्याकडून मिळाले होते. कमीत कमी गरजा असणे हेच आनंदी जीवन जगण्याचे रहस्य समजले.
अध्यक्ष श्री. राजेंद्र कुलकर्णी व सौ. आरती कुलकर्णी, कोषाध्यक्ष श्री. नितीन अट्रावलकर व सौ. अर्चना अट्रावलकर, कार्याध्यक्ष डॉ. विकास पाटील, माजी अध्यक्ष श्री. किशोर महाजन व सौ. आरती महाजन, सचिव सौ. सुनीता महाजन, सहसचिव सौ. माधुरी कोल्हे व श्री. कोल्हे सदस्य श्री. विनय काळे, श्री. सुभाष महाजन, सौ. ज्योत्स्ना पालेकर, डॉ. सौ. सुजाता महाजन, सौ. नंदिनी पानट मॅडम, सौ. उज्वला चौधरी या सर्वांच्या अथक परिश्रमातून ही दोन दिवसीय अभ्यास सहल यशस्वी झाली

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम