ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र नावावर आक्षेप

बातमी शेअर करा...

ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र नावावर आक्षेप

राज्य संघटनेने नोटीस बजावून दर्शविला विरोध ; न्यायालयात जाणार

जळगाव : महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत पात्र सदस्यांच्या यादीपैकी तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र संघटनेच्या नावावर अधिकृत महाराष्ट्र संघटनेने आक्षेप घेतला आहे. तायक्वांदो मध्ये दोन संघटना कार्यरत असतील आणि त्यांच्यात वादविवाद तसेच कोर्ट केस सुरू असेल तर, त्यापैकी एकाच संघटनेला मतदानाचा अधिकार कसा काय दिला जाऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित करून न्याय न मिळाल्यास त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा, तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र मुंबई संघटनेचे महासचिव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्री मिलिंद पठारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेतर्फे अलीकडेच एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात येत्या २ नोव्हेंबरला ऑलिंपिक संघटनेची निवडणूक घेण्याचा निर्णय झाला आहे. मतदान प्रक्रियेसाठी पात्र राज्यांतील २२ अधिकृत क्रीडा संघटनांची प्राथमिक यादी प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीत राज्यात तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र या नावाने कार्यरत असलेल्या दोन संघटनांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. दोन्ही संघटनांच्या स्वतंत्र निवडणुका झाल्या असून दोन्ही संघटना देशपातळीवर दोन वेगवेगळ्या फेडरेशनला संलग्न आहेत. न्यास नोंदणी व न्यायालयातही वाद सुरू आहे. असे दोन संघटनांमध्ये वाद सुरू असताना तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र नावाचा समावेश मतदानासाठी पात्र संघटनांच्या यादीमध्ये समावेश आहे , मात्र या नावावर तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र, मुंबई संघटनेला आक्षेप आहे. महासचिव मिलिंद पठारे यांच्या मते, घटनेतील तरतुदीनुसार तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र मुंबई ही संघटना केवळ तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियालाच संलग्न असू शकते व ती संलग्नता आमच्याकडे आहे.

ऑलिंपिक संघटनेवर पुढचे पाऊल अवलंबून

या प्रकरणी आम्ही महाराष्ट्र ॲालिम्पिक असोसिएशनला कायदेशीर नोटीस बजावली आहे. आम्ही दिलेल्या आक्षेपावर ऑलिंपिक संघटना काय निर्णय घेते, यावर आमचे पुढचे पाऊल अवलंबून असणार आहे. यासंदर्भात न्यायालयाचे दार ठोठावण्याचा पर्याय आमच्याकडे उपलब्ध असल्याचे श्री. पठारे या वेळी म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंडिया तायक्वांदो विरूद्ध आमची न्यास नोंदणी कार्यालय मुंबई येथे केस सुरू आहे. असे असताना महाराष्ट्र ॲालिम्पिक असोसिएशनचा मनमानी एकाला एक व दुसऱ्या बाजूला दुसराच नियम सोईस्कर पद्धतीने लावून मनमानी कारभार सुरू आहे. शिवाय, तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाने आम्हाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या समांतर संघटनेला आगामी निवडणुकीत मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी आमची मागणी आहे. ऑलिंपिक संघटनेच्या परिपत्रकाप्रमाणे याविषयी आम्ही निर्धारित तारखेच्या आत (२३ सप्टेंबर) आपला आक्षेप नोंदविला आहे.

मिलिंद पठारे म्हणाले, राज्यातील इतरही अनेक क्रीडा संघटनांमध्ये वाद सुरू असून, न्यायालयात खटले चालू आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दोनपैकी एका संघटनेला मतदानाचा अधिकार देणे पूर्णपणे चुकीचे आहे. एकतर दोन्ही संघटनांना मतदानाचा अधिकार द्यावा किंवा कुणालाच देऊ नये. सर्वांसाठी सारखा नियम असायला पाहिजे.

मान्यता तत्काळ रद्द करावी.

संघटना राज्य ऑलिंपिक संघटनेची मान्यताप्राप्त कशी असू शकते ? राज्यातील अधिकृत राज्य संघटनेसंबंधात कोर्टात वाद सुरू असल्याने येणाऱ्या महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र या नावे संस्थेला सहभागी करून घेणे, तसेच या संस्थेला ऑलिंपिक संघटनेची मान्यता मिळणे, यावर आमचा प्रामुख्याने आक्षेप आहे. या आक्षेपाची नोंद घेऊन तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र या नावाने दुसरे पदाधिकारी असलेल्या संघटनेची मान्यता तत्काळ प्रभावाने रद्द करून या संघटनेला आगामी निवडणुकीत सहभागी होण्यास मनाई करावी, अशी आमची मुख्य मागणी आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम