
औषध निरीक्षकासह पंटरला ८ हजारांची लाच घेतांना अटक
धुळ्याच्या आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औषध निरीक्षकासह पंटरला ८ हजारांची लाच घेतांना अटक
धुळ्याच्या आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव /धुळे प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी पशूपक्षी फार्मा दुकानाच्या परवान्यासाठी ८ हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून देशमुख आणि त्यांच्या साथीदार तुषार जैन यांना अटक केली आहे. दोघांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर येथील तक्रारदाराने भाड्याने घेतलेल्या गाळ्यात पशूपक्षी फार्मा दुकान सुरू करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तक्रारदार आणि त्यांच्या आतेभावाने औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली. देशमुख यांनी शिरपूर येथील मेडिकल दुकानदार तुषार जैन यांच्यासह ४ मार्च रोजी दुकानाच्या स्थळ पाहणीसाठी येणार असल्याचे सांगून, त्यासाठी तुषार जैन यांना ८ हजार रुपये द्यावे लागतील, असे सूचित केले.
लाच मागणीमुळे तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने शिरपूर येथे जाऊन तक्रारीची पडताळणी केली. औषध निरीक्षक किशोर देशमुख आणि तुषार जैन यांनी तक्रारदाराच्या दुकानावर स्थळ पाहणी दरम्यान ८ हजार रुपयांची लाच मागितली. लाचेची रक्कम धुळ्यातील पारोळा चौफुलीवर देण्याचे ठरले होते. ११ मार्च रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचून तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना तुषार जैनला रंगेहात पकडले. त्यानंतर औषध निरीक्षक किशोर देशमुख यांना अन्न व औषध प्रशासन कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम