कंडारी–गाडेगाव रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

बातमी शेअर करा...

कंडारी–गाडेगाव रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
कृषक, विद्यार्थी व सामान्य जनतेसाठी जीवनदायिनी ठरणार हा मार्ग – गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट कंडारी–गाडेगाव या ६.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे भूमिपूजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्यासाठी तब्बल ७ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून संपूर्ण रस्ता काँक्रीटचा असेल. यात एक लहान पूल, १०० मीटर सुरक्षा भिंत, १६ मोऱ्या व स्लॅब पुलांचा समावेश आहे.

या वेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “ही जीवनदायिनी सडक शेतकऱ्यांच्या पायांना पंख देणारी ठरणार आहे. दोन तालुके – जळगाव व जामनेर – यांना ही सडक जोडणार असून शेतकऱ्यांचे उत्पादन वेळेवर बाजारात पोहोचेल, विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला जाणे सुलभ होईल तसेच ग्रामीण भागाचा जीवनमान उंचावेल.” त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या सहकार्याबद्दल आभारही मानले.

पाटील यांनी यावेळी कंडारी गावात भील बस्ती व मुख्य वस्तीला जोडणाऱ्या छोट्या पुलाच्या कामास ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. हे काम पावसाळा संपताच सुरू होणार आहे. तसेच ग्रामपंचायतीला शेतपणंद रस्त्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले. गावातील स्मशानभूमीचे बांधकाम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

या भूमिपूजन सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाले, तालुकाप्रमुख शिविराज पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष राजू चव्हाण, जनप्पा पाटील (कोळी), रमेशप्पा पाटील, नंदुआबा देशमुख, ग्रामपंचायत सदस्य लताबाई भील, कृष्णा मोरे, अविनाश सोनावणे, सुरेखा देशमुख, माजी सरपंच नूतन देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपतालुकाप्रमुख संदीप सुरालकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बबलू देशमुख यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम