
कचरा संकलनाची वाहने हस्तांतरासाठी वॉटरग्रेसला महापालिकेचे पत्र
कचरा संकलनाची वाहने हस्तांतरासाठी वॉटरग्रेसला महापालिकेचे पत्र
जळगाव : शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी इंडिया कंपनीकडे सोपवण्याचा निर्णय जळगाव महानगरपालिकेने घेतला असून, त्यानुसार संबंधित प्रक्रियेला गती देण्यात येत आहे. बीव्हीजी कंपनीकडून अनामत रक्कम व बँक गॅरंटी जमा करण्यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाने पत्र पाठवले आहे. याच पार्श्वभूमीवर, कचरा संकलनासाठी सध्या कार्यरत असलेल्या वॉटरग्रेस कंपनीला वापरात असलेली वाहने विमा, फिटनेससह पूर्णपणे तपासून मनपाकडे हस्तांतरित करण्याबाबत पत्राद्वारे सूचना करण्यात आल्या आहेत.
महापालिकेने जळगाव शहरातील स्वच्छता कामकाजासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. या निविदेत तीन कंपन्या पात्र ठरल्या होत्या. बीव्हीजी इंडियाचा दर सर्वात कमी असल्यामुळे नियमांनुसार त्यांना काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, वॉटरग्रेस कंपनीनेही आपले दर कमी असल्याचा दावा करीत महापालिकेकडे आपत्ती दाखल केली होती. परिणामी, बीव्हीजीला काम देण्यात विलंब झाला.
या परिस्थितीत बीव्हीजी इंडियाने न्यायालयात याचिका दाखल केली, त्यानंतर वॉटरग्रेस कंपनीनेही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया दीर्घकाळ लांबण्याची शक्यता लक्षात घेता, महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत बीव्हीजी इंडिया कंपनीला कचरा संकलनाचा मक्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १ जूनपासून बीव्हीजीने काम सुरू करावे, यासाठी बँक गॅरंटी व अनामत रक्कम तत्काळ भरावी, असे निर्देश आरोग्य विभागाने पत्राद्वारे दिले आहेत.
दरम्यान, वॉटरग्रेस कंपनीकडे असलेल्या कचरा संकलनाच्या वाहनांचा विमा, फिटनेस प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून ही वाहने सुस्थितीत महापालिकेकडे तातडीने हस्तांतरीत करावीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम