
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा ; जुक्टो संघटनेची मागणी
तक्रार निवारण सभेत शिक्षकांच्या विविध मागण्यांना वाचा; आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा ; जुक्टो संघटनेची मागणी
तक्रार निवारण सभेत शिक्षकांच्या विविध मागण्यांना वाचा; आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती
प्रतिनिधी | जळगाव
जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे अनेक शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही समस्यांचे निराकरण झालेले नसल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. जुक्टो संघटनेच्या वतीने आयोजित तक्रार निवारण सभेत या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आणि विलंब न लावता समस्यांचे निवारण करण्याची मागणी करण्यात आली.
तक्रार निवारण सभा जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या सभागृहात एच.डी. भिरुड यांच्या अध्यक्षतेखाली झाली, तर प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर आमदार सत्यजित तांबे उपस्थित होते. यावेळी प्रा. नंदन वळिकार (अध्यक्ष), डॉ. अतुल इंगळे (उपाध्यक्ष), शैलेश राणे (कार्याध्यक्ष), प्रा. सुनील गरुड आदी शिक्षक प्रतिनिधींनी शिक्षकांच्या विविध मागण्यांची सविस्तर मांडणी केली.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे: – थकित वेतन देयकांची तातडीने अदा करावे , सेवानिवृत्त उ.मा.वि. आणि क.म.वि. शिक्षकांना सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता तत्काळ द्यावा , मयत व सेवानिवृत्त NPS धारकांचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावावेत , अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव टप्पा देण्यात यावा , वाढीव पदावर कार्यरत शिक्षकांचे समायोजन त्वरित करावे , कला शाखेसाठी विद्यार्थ्यांची संख्या अट शिथिल करण्यात यावी , २०१८-१९ पासून रखडलेले घड्याळी तासिकेवरील शिक्षकांचे वेतन अदा करावे , NPS जमा रकमेचा हिशोब आणि भ.नि.नि. पावत्यांचा तपशील तातडीने द्यावा ,सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक पदासाठी पूर्ण वेळ अधिकारी आणि दीड वर्षांपासून रिक्त असलेले सहाय्यक लेखाधिकारी पद तातडीने भरावे आदी मागण्या करण्यात आल्या.
या सभेत पारोळा तालुकाध्यक्ष प्रा. शशिकांत पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ. संदीप पाटील आणि अनेक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत शासनदरबारी या बाबींचे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम