
कन्नड घाटात दुचाकीस्वारांची लूट; तिघे गजाआड
कन्नड घाटात दुचाकीस्वारांची लूट; तिघे गजाआड
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई
चाळीसगाव प्रतिनिधी कन्नडहून चाळीसगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून चाकूचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या तिघांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत लोळण देत गजाआड केले. संशयितांकडून गुन्ह्यातील रिक्षा, चाकू, ४ हजार १०० रुपये रोख रक्कम आणि लुटलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
घटनेत जखमी झालेला मंगेश बंडू आल्हाट (वय २२) हा २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता हतनूरहून चाळीसगावकडे आपल्या दोन मित्रांसह दुचाकीने जात होता. कन्नड घाटाच्या पायथ्याशी ते लघुशंकेसाठी थांबले असताना, एका रिक्षातून तीन अनोळखी तरुण खाली उतरले. त्यांनी चौकशीच्या बहाण्याने आल्हाटवर अचानक हल्ला केला. यातील एका संशयिताने चाकूने वार करून आल्हाटच्या खिशातील ६ हजार ४०० रुपये हिसकावले. तर मित्र निवृत्ती भडंग याला मारहाण करून त्याचा मोबाईल घेतला. भीतीने तिसरा मित्र विशाल केवट घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून विशेष पथक तयार केले. कोणताही ठोस धागा नसतानाही पथकाने तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित रिक्षाचालक ऋषिकेश कासार याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांची नावे उघड केली. त्यानुसार जय बाबाजी चौक, चामुंडा माता मंदिर परिसरातील गणेश महेंद्र पवार आणि रमेश उर्फ वाल्मीक सोमनाथ सुपलेकर यांनाही अटक करण्यात आली.
पोलिसांनी लुटलेले पैसे, मोबाईल, चाकू आणि वापरलेली रिक्षा जप्त केली असून पुढील तपास पोउनि प्रदीप शेवाळे हे सपोनि नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. घाट परिसरातील लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने नागरिकांनी ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम