
कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
जामनेर तालुक्यातील किन्ही येथील घटना
जामनेर
आर्थिक अडचणींमुळे किन्ही येथील शेतकरी शांताराम सुपडू आवारे (वय ४६) यांनी आत्महत्या केली. शांताराम आवारे हे काही वर्षांपासून शेतीसाठी घेतलेल्या कर्जामुळे आणि खाजगी सावकारी कर्जाच्या दबावाखाली होते. यामुळे ते मानसिक तणावात होते, आणि अखेर त्यांनी आपल्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास लावून जीवन संपवले
शांताराम आवारे यांच्या काकाने दिलीप आवारे यांना शेताच्या बांधावर काम करत असताना त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तत्काळ कुटुंबीयांना माहिती दिली.
शांताराम यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि वडील असा कुटुंब आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात शोक व्यक्त केला जात आहे.
फत्तेपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास स.पो.निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. तुपार इंगळे करत आहेत.
या घटनेने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. आर्थिक तणाव आणि कर्जाच्या बोजामुळे अशा प्रकारच्या दुःखद घटना घडत आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अधिक ठोस उपाययोजना घेण्याची आवश्यकता आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम