कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; दुबार पेरणीच्या संकटाचा ताण जीवावर

बातमी शेअर करा...

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; दुबार पेरणीच्या संकटाचा ताण जीवावर

जळगाव (प्रतिनिधी) – कर्जबाजारीपणा आणि यंदाच्या दुबार पेरणीच्या संकटाने त्रस्त झालेल्या डोमगाव येथील ३८ वर्षीय शेतकऱ्याने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (७ जुलै) दुपारी अडीचच्या सुमारास म्हसावद रेल्वे गेटजवळ घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव किशोर आसाराम धनगर (वय ३८, रा. डोमगाव) असे आहे. त्यांनी पुष्पक एक्स्प्रेसच्या धावत्या गाडीखाली उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर धनगर हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीच्या माध्यमातून करत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे आणि वाढत्या कर्जामुळे ते मानसिक तणावाखाली होते. यंदा त्यांनी लवकर पेरणी केली होती, मात्र पावसाने उघडीप दिल्याने पिके वाया गेली आणि दुबार पेरणीचे संकट उभे राहिले. या परिस्थितीने त्रस्त होऊन त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

सोमवारी सकाळी त्यांनी घरून शेतात जाण्याचे सांगितले. शेतात काही वेळ काम केल्यानंतर ते थेट म्हसावद रेल्वे गेटजवळ गेले आणि पुष्पक एक्स्प्रेस समोर उडी घेतली. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

किशोर यांच्या पश्चात आई सुनंदाबाई, पत्नी उज्ज्वला, सात वर्षांचा मुलगा व पाच वर्षांची मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्युमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक हेमंत जाधव करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम