
कळमसरे शिवारात आग; १२ शेतकऱ्यांचे २९ लाखांचे नुकसान
कळमसरे शिवारात आग; १२ शेतकऱ्यांचे २९ लाखांचे नुकसान
ग्राम महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा
अमळनेर | प्रतिनिधी
तालुक्यातील मारवड, ढेकू नंतर आता कळमसरे शिवारातील शेतात आग लागून मोठे नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमुळे शेतात कापणीसाठी साठवून ठेवलेली ज्वारी व चारा जळून खाक झाला आहे. या आगीत तब्बल १२ शेतकऱ्यांचे एकूण २९ लाख ५६ हजार ८७६ रुपयांचे नुकसान झाले आहे.
या संदर्भात ज्ञानेश्वर एकनाथ बडगुजर यांनी मारवड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचे कळमसरे शिवारात पाच बिघे शेती असून त्यात ज्वारी पीक घेतले होते. कापणीसाठी ज्वारी कापून शेतात ढिग करून ठेवण्यात आली होती. ११ एप्रिल रोजी शेजारील शेतात लागलेली आग त्यांच्या शेतात पसरली आणि संपूर्ण ज्वारीची गंजी जळून खाक झाली. या ज्वारीपासून सुमारे १०० क्विंटल उत्पादन अपेक्षित होते.
मारवडमध्येही मोठे नुकसान
दरम्यान, मारवड परिसरातही काही दिवसांपूर्वी आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुंजू शिवलाल चौधरी यांचे ७ लाख ९१ हजार, प्रवीण आधार पाटील यांचे ३ लाख ७७ हजार, किरण वसंतराव साळुंखे २ लाख २५ हजार, कैलास रामचंद्र पाटील २ लाख ७६ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
विलास प्रकाश पाटील २ लाख ५० हजार, महेश हेमकांत पाटील १ लाख ५० हजार रुपये, सचिन गुलाबराव पाटील १ लाख ३१ हजार, अशोक अमृत पाटील १ लाख ३५ हजार, दिलीप नीलकंठ पाटील १ लाख ३५ हजार, रवींद्र अमृत पाटील ८५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. मांगो पीतांबर पाटील २ लाख ३१ हजार ८७६ रुपये, गजानन मन्साराम चौधरी १ लाख ७० हजार रुपये असे एकूण २९ लाख ५६ हजार ८७६ रुपयांचे नुकसान झाले. ग्राम महसूल अधिकारी महेंद्र भावसार यांनी पंचनामा केला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम