कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा

बातमी शेअर करा...

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा

 

आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या हक्कांविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन

 

जळगाव, दि. ८ (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्रातर्फे ‘जागतिक आदिवासी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आदिवासी वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला आणि आदिवासी संस्कृती, परंपरा व त्यांच्या हक्कांविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात माधवी प्रधान या विद्यार्थिनीने वाहरू सोनवणे यांची ‘स्टेज’ ही कविता सादर करून केली. त्यानंतर सुवर्णा पाटील हिने जागतिक आदिवासी दिनाची माहिती दिली, तर स्वप्नील जाधव या विद्यार्थ्याने मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचे महत्त्व सांगितले.

अर्जुन पावरा आणि गुलाबसिंग पटले या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे पावरा आणि भिल्ल समाजाची माहिती दिली. अनुष्का पवार हिने सातपुडा परिसरातील आदिवासींचे सण, उत्सव, लग्न आणि भोंगऱ्या बाजाराचे महत्त्व विशद केले. गायत्री वळवी हिने नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बोलीतून लग्नविधीचे वर्णन केले, ज्याचा अनुवाद अनुष्का पवारने केला. संशोधक विद्यार्थी महेश सूर्यवंशी यांनी कवी संतोष पावरा यांची कविता सादर केली. इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक कृष्णा संदानशिव यांनी क्रांतीगीत सादर केले, तर हिंदी विषयाच्या सहायक प्राध्यापिका स्नेहा गायकवाड यांनी आदिवासी संस्कृती आणि वारशावर प्रकाश टाकला.

शिक्षणाशिवाय विकास नाही : डॉ. म. सु. पगारे

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात भाषा अभ्यास प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे म्हणाले की, “जे लोक शिक्षणापासून, सोयीसुविधांपासून आणि सामाजिक-आर्थिक हक्कांपासून वंचित आहेत, त्या सर्वांना आदिवासी म्हणून गणले पाहिजे. आदिवासींनी केवळ पारंपरिक संस्कृतीला चिकटून न राहता शिक्षणाची कास धरावी. जेव्हा ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील, तेव्हाच संपूर्ण मानव समूहाचे कल्याण साधले जाईल.”

या कार्यक्रमाला प्रशाळेतील प्राध्यापक डॉ. दीपक खरात, डॉ. सुदर्शन भवरे, डॉ. प्रीती सोनी, कृष्णा संदानशिव, भारती सोनवणे, प्रतिभा गलवाडे, स्नेहा गायकवाड, शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत बिऱ्हाडे आणि मराठी, हिंदी, इंग्रजी विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संशोधक विद्यार्थी खेमराज पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम